गेल्या २ वर्षांपासून जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. कोरोनामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली. तसेच अनेकांचे मोठे नुकसान देखील झाले. यावर तोडगा काढण्यासाठी लसीचा शोध लावण्यात आला होता. भारताने या काळात अनेक देशांना मदतीचा हात दिला होता. आता दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन प्रकार ऑमिक्रॉन आढळून आला आहे. यातून सावरण्यासाठी भारत पुन्हा एकदा मदत करण्यासाठी पुढे आला आहे. अशातच दिग्गज इंग्लिश क्रिकेटपटूने भारताचे कौतुक केले आहे.
इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू केविन पीटरसन याने कोविड-१९ च्या ऑमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे प्रभावित झालेल्या देशांना मदत केल्याबद्दल भारताचे कौतुक केले आहे. त्याने ट्विटरवर लिहिले की, ‘भारताने पुन्हा एकदा मदत करण्याचे धाडस दाखवले आहे.’ सोमवारी (२९ डिसेंबर) परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध होते, की ऑमिक्रॉनमुळे प्रभावित झालेल्या आफ्रिकन देशांना मदत करण्यासाठी भारत त्यांच्या पाठीशी पुन्हा आहे. तसेच मेड इन इंडिया लस आणि औषधे पुरवण्यासाठी देखील तयार आहे.
भारताने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. अशातच केविन पीटरसनने देखील ट्विट करत कौतुक केले आहे. त्याने लिहिले की, “भारताने पुन्हा एकदा मदत करण्याचे धाडस दाखवले आहे. अनेक चांगली लोकं असलेला अद्भुत देश! धन्यवाद!” या ट्विटमध्ये त्याने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केले आहे. पीटरसनचा मूळ देश दक्षिण आफ्रिका असून, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते.
यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, भारत सरकार आफ्रिकन देशांमध्ये आवश्यक औषधी, टेस्ट किट, पीपीई किट, व्हेंटीलेटरसह आवश्यक त्या औषधी पाठवण्यास तयार आहे. याबाबत मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करत म्हटले आहे की, ‘हा पुरवठा कोवॅक्सद्वारे किंवा द्विपक्षीयरित्या केला जाऊ शकतो. मलावी, इथिओपिया, झांबिया, मोझांबिक, गिनी आणि लेसोथो या आफ्रिकन देशांमध्ये कोविशील्ड लस वितरीत करण्यासाठी कोवॅक्सने दिलेल्या सर्व आदेशांना सरकारने मान्यता दिली आहे.’