न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिकेत भारतीय संघाचा दारुण पराभव झाला आहे. किवी संघानं टीम इंडियाचा 3-0 असा व्हाईटवॉश केला. या मालिकेतील तिसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला, जिथे भारताला अवघ्या 3 दिवसांत पराभव पत्कारावा लागला.
मुंबईच्या मैदानावर भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले. टीम इंडियाला चौथ्या डावात 147 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आला नाही. भारताचा दुसरा डाव अवघ्या 121 धावांत आटोपला. या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. रोहित शर्मा दोन डावात मिळून केवळ 29 धावा (18 आणि 11) करू शकला. तर विराट कोहलीच्या बॅटमधून केवळ 5 धावा (4 आणि 1) निघाल्या.
भारताच्या या पराभवानंतर संघावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. अनेक माजी खेळाडूंनी रोहित-विराट सारख्या अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. याच संदर्भात इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन यानं भारतीय फलंदाजांना सोशल मीडियावर ट्रोल केलं. पीटरसननं ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली. या पोस्टद्वारे त्यानं भारतीय फलंदाजांची खिल्ली उडवली आहे.
केविन पीटरसननं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, वानखेडे स्टेडियमवर कसोटी शतक ठोकणं सोपं नाही. पीटरसनच्या पोस्टचा रेफरन्स म्हणजे, त्यानं 2012 मध्ये भारताविरुद्ध या मैदानावर कसोटीत 186 दावा ठोकल्या होत्या. इंग्लंडनं ती मॅच आणि सिरीज जिंकली होती. इंग्लंडच्या या मालिकाविजयानंतर भारतीय संघानं घरच्या मैदानावर सलग 18 कसोटी मालिका जिंकल्या. टीम इंडियाचा हा विजय रथ आता न्यूझीलंडनं रोखला आहे. यावर मजा घेत इंग्लंडच्या या माजी फलंदाजानं ही पोस्ट केली. केपीच्या या पोस्टवर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. तुम्ही त्याची ही पोस्ट येथे पाहू शकता.
Not easy scoring Test 100s at the Wankhede….! 😁
— Kevin Pietersen🦏 (@KP24) November 3, 2024
हेही वाचा –
रोहित शर्मा फलंदाजीत फ्लॉप का होतोय? माजी खेळाडूनं कारण सांगितलं, म्हणाला…
विराट-रोहितला कसोटीतून ड्रॉप करण्याची वेळ आली आहे का? आकडेवारी जाणून घ्या
40 वर्षीय भारतीय यष्टीरक्षकाची निवृत्तीची घोषणा, 2010 मध्ये केलं होतं पदार्पण