मराठीत कबड्डीच्या बातम्या नाहीत, कबड्डीच्या घडामोडींची माहिती मराठीत उपलब्ध नाही असे म्हणणाऱ्या कबड्डीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खेल मीडिया नेटवर्क्स प्रायव्हेट लिमीटेड घेऊन येत आहे कबड्डीची नवीकोरी मराठी वेबसाईट!
कबड्डीचे जाणकार, खेळाडू, पंच, विविध कबड्डी क्लब यांना खेल कबड्डी हे नाव नवे नाही. कबड्डी क्षेत्रातील सगळ्या घडामोडी एकाच ठिकाणी उपलब्ध करून द्यायच्या या उद्देशाने १५ ऑगस्ट २०१८ ला खेल कबड्डीची सुरुवात झाली. खेल कबड्डी ही जगातील पहिली अशी वेबसाईट आहे जी कबड्डी जगतातील सर्व घडमोडी इंग्रंजी भाषेत आपल्यापर्यंत गेले दोन वर्ष पोहचवत आहे.
यात कबड्डीच्या ताज्या घडामोडी, विशेष मुलाखती, पंचांचे प्रश्न, संघनिवडीबाबतच्या चर्चा या आणि अशा अनेक विषयांना खेल कबड्डीने व्यासपीठ निर्माण करून दिले. कबड्डीला पुढे न्यायचे ह्या हेतूने सुरु केलेली ही वेबसाईट अल्पावधीतच जगभरात प्रसिद्ध झाली. अनेक आजी माजी खेळाडू, पंच, प्रशिक्षक तसेच कबड्डीशी संबंधितांचे फेसबुक लाईव्ह सेशन या वेबसाईटच्या माध्यमातून आजपर्यंत पार पडले आहेत.
मात्र खेल कबड्डीवर बातम्या, माहिती किंवा लेख इंग्रजी भाषेत असतात. कबड्डीची सगळी माहिती एकाच ठिकाणी आणि तीही मराठीत मिळावी अशी कबड्डीरसिकांची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. कबड्डी प्रेमींच्या मताचा कायमच आदर करणाऱ्या खेल कबड्डीने या मागणीला प्रतिसाद देत आता मराठी वेबसाईट सुरु केली आहे. उद्या १ मे २०२० रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ही वेबसाईट सादर केली जात आहे.
खेल कबड्डी संपादक आदित्य गुंड यांनी या वेबसाईटच्या मराठी आवृत्तीबद्दल आनंद व्यक्त केला. “मराठी वाचकांची संख्या डिजीटल माध्यमांवर मोठी आहे. परंतु त्या प्रमाणात कंटेंट उपलब्ध होतं नाही. कबड्डीसारख्या खेळाचे मोठे चाहते असूनही त्याबद्दल फारच कमी माहिती डिजीटल माध्यमांवर आपल्याला दिसते. याच उद्देशाने ही वेबसाईट मराठीत सुरु करण्याचा आम्ही विचार केला. येत्या काळात येथे आपल्याला नक्कीच उच्च दर्जाचा कंटेंट पहायला मिळेल,” असे यावेळी आदित्य गुंड म्हणाले.
खेल मीडिया नेटवर्क्स प्रायव्हेट लिमीटेडची सुरुवात २०१८ साली झाली असून यामागे शरद बोदगे, चिन्मय रेमणे व आदित्य गुंड हे तीन मराठी चेहरे आहेत.
आपण खेल कबड्डी मराठीला marathi.khelkabaddi.in येथे भेट देऊ शकता. तसेच सध्या वेबसाईटच्या फेसबुक पेज आपण facebook.com/KhelKabaddiMarathi या लिंकवर क्लिक करुन लाईक करु शकता.