पुणे। ताकदवान कौशल्याच्या क्रीडा प्रकारांना गुरुवार (दि.१०) पासून प्रारंभ होत असून ज्युदोत आदित्य धोपावकरकडून महाराष्ट्राला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. आदित्य याने जयपूर येथे गतवर्षी झालेल्या राष्ट्रकुल ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले होते.
आदित्य धोपावरकर म्हणाला, गतवर्षी खेलोे इंडिया स्पर्धेत मला ब्राँझपदक मिळाले होते. यंदा मात्र मी अव्वल कामगिरी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे. त्यासाठी भरपूर गृहपाठ केला आहे. जयपूर येथील राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेतील रुपेरी कामगिरीमुळे माझा आत्मविश्वाास उंचावला आहे. या रौप्यपदकानंतर भारतीय ज्युदो महासंघाने मला ब्लॅकबेल्ट सन्मानाने गौरविले होते. ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू अश्विनी सोळंकी हिच्यावरही महाराष्ट्राची मदार आहे. ती १७ वर्षाखालील गटातील ४८ किलो विभागात सहभागी झाली आहे. ती म्हणाली, गतवर्षी खेलो इंडिया स्पर्धेत मला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. यंदा मात्र हे अपयश धुवून काढण्यासाठी मी उत्सुक झाले आहे.