पुणे। देशभरातील युवा खेळाडूंचे कौशल्य पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रीडा चाहत्यांना बुधवार (दि.९जानेवारी) पासून खेळाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. देशभरातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या खेलो इंडिया क्रीडा महोत्सवाला बुधवारी सायंकाळी ६ वाजता प्रारंभ होणार आहे. त्यामध्ये खेळाडू, प्रशिक्षक व अन्य पदाधिकारी मिळून १० हजार लोकांचा सहभाग असणार आहे.
केंद्रीय क्रीडामंत्री व ऑलिंपिक रौप्यपदक विजेते नेमबाज राजवर्धनसिंह राठोड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. दोन तास चालणा-या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्रातील परंपरिक लोककलांचे सादरीकरण होणार आहे. या समारंभासाठी राज्यातील अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच ज्येष्ठ ऑलिंपिकपटूंना निमंत्रित करण्यात आले आहे. राज्यातील विविध खात्यांचे मंत्री, स्थानिक आमदार व खासदारांनाही निमंत्रीत करण्यात आले असून सर्वांकरिता विशेष आसनव्यवस्था करण्यात आली आहे.
उद्घाटन सोहळ्यात महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण, महोत्सवानिमित्त प्रकाशित करण्यात येणा-या महाराष्ट्र राज्याचे मुखपत्र असलेल्या लोकराज्यचे प्रकाशन करण्यात येणार आहे. सहभागी खेळाडूंचे शानदार संचलन, क्रीडाज्योत प्रज्वलन आदी कार्यक्रमांचाही या सोहळ्यात समावेश आहे. महोत्सवासाठी विविध राज्यांच्या खेळाडूंचे आगमन झाल्यामुळे क्रीडानगरीत चैतन्याचे वातावरण निर्मण झाले आहे. हॉकीसह जिम्नॅस्टिक खेळांच्या स्पर्धांस प्रारंभ झाला आहे. अन्य खेळांसाठी आलेल्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे.
– क्रीडाविषयक चित्रे आणि पोस्टर्समधून जनजागृती:
क्रीडानगरीतील विविध भितींवर नानाविध खेळांची चित्रे रंगविण्यात आली आहे. तसेच संपूर्ण क्रीडानगरीमध्ये आवश्यक त्याठिकणी रंगरंगोटीही करण्यात आली आहे. क्रीडनगरीप्रमाणेच पुणे आणि पिपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी या महोत्सवाबाबत आकर्षक पोस्टर्स लावण्यात आली आहेत. विशेषत: दोन्ही शहरांमधील शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांवळ ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत.
– सुरक्षा व्यवस्था, तांत्रिक अधिकारी व वाहतूक व्यवस्था सज्ज:
महोत्सवाच्या काळात विद्यार्थ्यांनी क्रीडानगरीस भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवावा, याबाबत शिक्षण संचालनालयाकडून सर्व शाळा व महाविद्यालयांना आवाहन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर विद्यार्थ्यांना संवाद साधण्याची संधी महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महोत्सवासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकाश होणार नाही, याची काळजीही घेण्यात आली आहे.
महोत्सवात सहभागी झालेल्या खेळाडू व अन्य पदाधिका-यांना अव्याहतपणे पिण्याचे पाणी मिळेल, याची दक्षता घेण्यात आली आहे. महोत्सवाकरीता येणा-या प्रेक्षकांकरीता सार्वजनिक बस व्यवस्था करण्याबाबतही संबंधित महापालिकांना कळवियात आले आहे. क्रीडा महोत्सवात ३६ राज्यांतील ६ हजार खेळाडू, १ हजार ८०० तांत्रिक अधिकारी, १ हजारहून अधिक संघटक आणि ७५०स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.