पुणे। केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत गुरुवारी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खो खो मध्ये वर्चस्व गाजविले. खो खो १७ व २१ वर्षाखालील मुले व मुली याच्या चारही गटात महाराष्ट्राच्या संघाने विजेतेपद पटकावित सुवर्णपदकाची कमाई केली. तर, कबड्डीमध्ये महाराष्ट्राच्या २१ वर्षाखालील मुलींच्या संघाला कास्यंपदकावर समाधान मानावे लागले. गुरुवार अखेर महाराष्ट्राच्या खात्यात ६८ सुवर्ण, ५१ रौप्य आणि ६२ कांस्यपदकांसह १८१ पदकसंख्या झाली आहे.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. याशिवाय मुष्टीयुद्ध, टेनिस, टेबल टेनिस, बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आगेकूच केली आहे.
खो खो :-
महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे १७ वर्षाखालील मुले व मुली या दोन्ही विभागात सुवर्णपदक जिंकून वर्चस्व गाजविले. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने अलाहिदा डावानंतर दिल्लीचे आव्हान १९-१७ असे परतविले. मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने आंध्रप्रदेशवर १९-८ असा दणदणीत विजय नोंदविला. मुलांच्या १७ वर्षाखालील गटात मात्र महाराष्ट्रास आंध्रप्रदेशविरुद्ध १९-८ असा विजय मिळविताना फारशी अडचण आली नाही. पूर्वार्धात त्यांनी ९-४ अशी आघाडी घेतली होती.
खो खो मधील २१ वर्षाखालील मुले व मुलींमध्ये महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली. मुलांच्या अंतिम सामन्यात त्यांनी केरळचा १५-१३ असा तीन मिनिटे ५० सेकंद बाकी राखून पराभव केला. त्यावेळी पूर्वार्धात महाराष्ट्रकडे १०-६ अशी आघाडी होती. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने केरळचा ७-६ असा एक डाव एक गुणाने पराभव केला.
मुष्टीयुद्ध :-
महाराष्ट्राच्या आकाश गोरखा, देविका घोरपडे यांच्यासह पाच खेळाडूंनी मुष्टीयुद्धात अंतिम फेरी गाठली आणि सुवर्णपदकाच्या आशा उंचावल्या. महाराष्ट्राने १७ व २१ वर्षालील मुले व मुली या चार गटांत मिळून २१ पदके निश्चित केली आहेत.
मुलांच्या १७ वर्षालील गटात आकाश याने ५७ किलो वजनी विभागाच्या उपांत्य फेरीत हरयाणाच्या अमन दुहान याच्यावर ५-० असा सफाईदार विजय मिळविला. याच वयोगटात महाराष्ट्राच्या शेखोमसिंग याने अंतिम फेरीत स्थान मिळविताना हरयाणाच्या विकासकुमार याच्यावर ५-० असा दणदणीत विजय नोंदविला. ५४ किलो विभागात बिश्वाामित्र चोंगोमथोम याने उपांत्य लढतीत मणीपूरच्या नईमेरकाप्मसिंग याचा ५-० असा पराभव केला. ५४ किलो गटात महाराष्ट्राच्या येईपाबा मोईती यानेही अंतिम फेरीकडे वाटचाल केली. त्याने पंजाबच्या अविनाश जंगवाल याचे आव्हान संपुष्टात आणले.
मुलींच्या १७ वर्षाखालील गटाच्या ४६ किलो विभागात देविका हिने विजयी घोडदौड राखताना हरयाणाच्या रिंकूकुमारी हिचा पराभव केला. चुरशीने झालेली ही लढत देविका हिने ३-२ अशी जिंकली. मुलींच्याच ४८ किलो गटात मात्र लक्ष्मी पाटील हिला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत तिला मणीपूरच्या टिंगमिला दिंगमिला हिने ५-० असे पराभूत केले.
मितिका, अजय, भावेशही अंतिम फेरीत
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मुष्टीयुद्धाच्या रिंगमध्ये आपला दबदबा कायम राखला. त्यांच्या मितिका गुणेले हिने १७ वर्षाखालील गटाच्या ६६ किलो विभागात केरळच्या अलिशा सनी या केरळच्या खेळाडूला ५-० असे निष्प्रभ केले. ६० किलो गटात महाराष्ट्राच्या सना गोन्साल्विस हिला हरयाणाच्या प्रीति दहिया हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. या लढतीमधील तीन मिनिटांच्या दुसºया फेरीतच पंचांंनी लढत थांबवून प्रीति हिला विजयी घोषित केले. १७ वषार्खालील मुलांच्या ६० किलो गटात महाराष्ट्राच्या लैश्रामसिंग याने उत्तराखंड संघाच्या सौरभ चंद याचे आव्हान ५-० असे संपुष्टात आणले.
मुलांच्या २१ वर्षाखालील गटातील ४९ किलो वजनी विभागात अजय पेंडोर याने चंडीगढच्या अंशुल पुनिया याच्यावर ५-० अशी मात केली. ४९ किलो गटात बरुणसिंग या महाराष्ट्राच्या खेळाडूने अंतिम फेरीत स्थान मिळविताना आंध्रप्रदेशच्या बेदिसला स्वरुप याचा ५-० असा पराभव केला. ५२ किलो विभागात भावेश कट्टीमणी या महाराष्ट्राच्या खेळाडूने अंतिम फेरी गाठली. त्याने मणिपूरच्या कोंगखामा नाओथोईम याच्यावर ५-० अशी मात केली. ५६ किलो विभागात रोहित चव्हाण याला पराभवास सामोरे जावे लागले. त्याला उत्तराखंडच्या पवन गुरंग याने सहज हरविले. ६० किलो गटात महाराष्ट्राच्या हरीवेश तावरी याला अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळाला.
मुलींच्या २१ वर्षाखालील गटात गौरी जयसिंगपुरे या महाराष्ट्राच्या खेळाडूला अंजली शर्मा या मध्यप्रदेशच्या खेळाडूने पराभूत केले. ५१ किलो गटात महाराष्ट्राच्या दिया बचे हिला दिल्लीच्या तन्वी कौशल हिच्याकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला. दिया हिने यापूर्वी कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले होते. ती गेली आठ वर्षे या खेळात असून सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करीत आहे.
फुटबॉल :-
आघाडी मिळविल्यानंतर फुटबॉलमध्ये वर्चस्व राखण्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंना अपयश आले, त्यामुळेच त्यांना मुलांच्या १७ वर्षाखालील उपांत्य फेरीत पंजाबविरुद्ध १-३ असा पराभव पत्करावा लागला. पूर्वार्धात महाराष्ट्राने १-० अशी आघाडी घेतली होती.
स्पर्धेत ३९ व्या मिनिटाला विनय कोकंदामुरी याने महाराष्ट्राचे खाते उघडले. या गोलच्या आधारे त्यांनी मध्यंतरापर्यंत आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात पंजाबच्या खेळाडूंनी धारदार आक्रमणास अचूकतेची जोड देत विजयश्री खेचून आणली. ४९ व्या मिनिटाला त्यांच्या एस.लोतजेम याने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. पाठोपाठ ६२ व्या मिनिटाला त्यांच्या एस.तरुण याने हेडिंगच्या साहाय्याने सुरेख गोल नोंदविला आणि संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या भरपाई वेळेत पंजाबच्या मंगमिंलुम सिंग्सोन याने संघाचा तिसरा गोल केला.
कबड्डी :-
घरच्या मैदानावर विजेतेपदाची अपेक्षा असलेल्या महाराष्ट्राला २१ वर्षाखालील मुलींच्या गटात उपांत्य फेरीतच पराभवाचा धक्का बसला. उपांत्य फेरीतील पराभवामुळे त्यांना कास्यंपदकावरच समाधान मानावे लागले.
उत्कंठापूर्ण लढतीत त्यांना हिमाचल प्रदेश संघाने २२-१९ असे पराभूत केले. पूर्वार्धात हिमाचल प्रदेश संघाने १२-१० अशी दोन गुणांची आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरली. हिमाचल प्रदेश संघाकडून पुष्पा हिने बोनस गुणांवर अधिकाधिक भर दिला. तसेच त्यांच्या खेळाडूंनी सांघिक कौशल्याचा प्रत्यय घडवित महाराष्ट्राच्या खेळाडूंना प्रभावी चढाया करण्यापासून वंचित ठेवले. महाराष्ट्राकडून सोनाली हेळवी व आसावरी खोचरे यांनी दिलेली लढत निष्फळ ठरली.
टेबलटेनिस :-
महाराष्ट्राच्या दिया चितळे व स्वस्तिका घोष यांनी टेबल टेनिसमधील पात्रता फेरीत विजय मिळवित १७ वर्षाखालील मुलींमध्ये मुख्य फेरीचे आव्हान राखले. दिया हिने टॉपस्पीन फटक्यांचा उपयोग करीत दिल्लीच्या तिशा कोहली हिच्यावर ११-६, ११-२, ११-१ असा दणदणीत विजय मिळविला. स्वस्तिका हिने दादरा नगर हवेली संघाच्या भूवी चतुवेर्दी हिचा ११-१, ११-१, ११-४ असा धुव्वा उडविला. तिने काऊंटर अॅॅटॅक पद्धतीचा बहारदार खेळ केला. याच वयोगटात महाराष्ट्राच्या समृद्धी कुलकर्णी हिला पश्चिम बंगालच्या पोयमंती बैश्या हिने ११-९, ११-७, ११-८ असे पराभूत केले.
मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या दीपित पाटील याला पश्चिम बंगालच्या तमल बालन याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. बालन याने हा सामना ३-११, ९-११, १४-१२, १२-१०, ११-७ असा रोमहर्षक विजय मिळविला. याच गटात महाराष्ट्राच्या चिन्मय सोमय्या याने अपराजित्व राखताना मैनाक दाल (पश्चिम बंगाल) याच्यावर ९-११, ११-९, ११-२, ५-११, ११-५ अशी मात केली. त्याचा सहकारी देव श्रॉफ यानेही आव्हान राखले. त्याने अंदमान व निकोबारच्या सॅम्युअल अडवानी याचा ११-४, ११-४, ११-८ असा पराभव केला.
टेनिस :-
महाराष्ट्राच्या प्रेरणा विचारे हिने मुलींच्या १७ वर्षाखालील एकेरीत अंतिम फेरी गाठली आणि टेनिसमध्ये सुवर्णपदकाच्या संधी निर्माण केल्या. मात्र तिची सहकारी गार्गी पवार हिला मात्र उपांत्य फेरीत पराभवास सामोरे जावे लागले. मुलांच्या 21 वर्षाखालील गटात ध्रुव सुनिश याने अंतिम फेरी गाठली. त्याने उपांत्य फेरीत चंदीगडच्या परविंदरसिंग बाजवा याचा ६-४, ६-२ असा पराभव केला.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सेंटर कोर्टवर झालेल्या उत्कंठापूर्ण लढतीत प्रेरणा हिने आंध्रप्रदेशच्या लक्ष्मी रेड्डी हिचे आव्हान संपुष्टात आणले. चुरशीने झालेला हा सामना प्रेरणा हिने ७-५, ६-४ असा जिंकला. प्रेरणा हिने क्रॉसकोर्ट फटक्यांबरोबरच बॅकहँड फटक्यांचाही सुरेख खेळ केला. तसेच तिने नेटजवळून प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. प्रेरणा हिला सुवर्णपदकासाठी गुजरातच्या प्रियांशी भंडारी हिच्याशी खेळावे लागणार आहे. प्रियांशी हिने एकतर्फी लढतीत गार्गी हिचा ६-२, ६-२ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला.
बास्केटबॉल :
शेवटच्या सेकंदापर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत तामिळनाडूने महाराष्ट्राला ११२-१०८ असे हरविले आणि बास्केटबॉलचे सामने पाहण्यासाठी जमलेल्या अनेक चाहत्यांना खेळाचा खरा आनंद मिळवून दिला.
मुलांच्या १७ वर्षाखालील गटाचा हा सामना विलक्षण चुरशीने खेळला गेला. दोन्ही संघांचे बाद फेरी गाठण्याचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले होते तरीही दोन्ही संघांच्या खेळाडूंनी जिद्दीने खेळ केला.
पूर्वार्धात तामिळनाडूने ४५-४३ अशी दोन गुणांची आघाडी घेतली होती. तामिळनाडू संघाकडून कर्णधार अल्विन बेसिल, हरीहरासुधन व वैषाक मनोज यांनी उल्लेखनीय खेळ केला. महाराष्ट्राच्या इम्रान खान, तेजस मांढरे व अकीब जरीवाला यांनी कौतुकास्पद झुंज दिली.