---Advertisement---

खेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत

---Advertisement---

पुणे। महाराष्ट्राने १७ व २१ वर्षाखालील मुले व मुली या गटांमध्ये सुवर्णपदक मिळविण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. त्यांनी १७ व २१ वर्षाखालील मुले व मुली या चारही गटांत अंतिम फेरी गाठली.

पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. महाराष्ट्राने २१ वर्षाखालील मुलांच्या उपांत्य फेरीत गुजरातचा १३-९ असा एक डाव चार गुणांनी पराभव केला. त्याचे श्रेय प्रतिक बांगर (अडीच मिनिटे), आयुष गुरव (तीन गडी), ओंकार हंचाटे (अडीच मिनिटे व एक गडी) यांच्या उल्लेखनीय कामगिरीस द्याावे लागेल. पराभूत संघाच्या भावेश बंकादिया याने दोन गडी टिपले तर केजल मालुसरे याने दीड मिनिट पळती व दोन गडी अशी कामगिरी केली. उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत केरळने आंध्रप्रदेश संघाला २१-११ असे पराभूत केले.

मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने ओडिशा संघाचे आव्हान १०-७ असे एक डाव तीन गुणांनी परतविले. त्यामध्ये प्रियंका भोपी हिने नाबाद ३ मि. २० सेकंद व नाबाद दीड मिनिटे असा पळतीचा खेळ केला. अपेक्षा सुतार (तीन मिनिटे), काजल भोर (२ मि. २० सेकंद व तीन गडी), कविता घाणेकर (२ मि. २० सेकंद) यांनी कौतुकास्पद वाटा उचलला. उपांत्य फेरीच्या अन्य सामन्यात केरळ संघाने दिल्ली संघावर ८-७ अशी सहा मिनिटे राखून मात केली.

मुलांच्या १७ वर्षाखालील उपांत्य लढतीत महाराष्ट्राने तामिळनाडूचा १२-६ असा एक डाव सहा गुणांनी पराभव केला. त्या वेळी त्यांनी पूर्वार्धात १२-२ अशी आघाडी घेतली होती. महाराष्ट्राकडून रोहन कोरे (साडेतीन मिनिटे व एक गडी), विजय शिंदे (२ मि.२० सेकंद व २ गडी), दिलीप खांडवी (नाबाद २ मि.४० सेकंद), चंदू चावरे (२ मि. व ३ गडी), विशाल दुकले (२ मि.४० सेकंद व ३ गडी) यांनी चमकदार खेळ केला. तामिळनाडूकडून एस.संत्रू व टी. गौतम यांनी एकाकी लढत दिली. अंतिम सामन्यात महाराष्ट््राची आंध्रप्रदेश संघाशी गाठ पडणार आहे. आंध्रप्रदेश संघाने उपांत्य लढतीत कर्नाटकला १७-१० असे सात गुणांनी पराभूत केले. त्या वेळी त्यांच्याकडून जे.नितीशकुमार याने सात गडी मारले तसेच दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी दीड मिनिट पळतीचा खेळ केला. त्याला वाय.गणेश व के.रामकृष्ण यांनी चांगली साथ दिली. कर्नाटकच्या सिद्ध रुडा व वेणूगोपाळ यांनी चिवट झुंज दिली.

मुलींच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने अंतिम फेरीत स्थान मिळविताना पंजाबचे आव्हान ७-६ असा पाच मिनिटे राखून पराभव केला. पूर्वार्धात त्यांनी ५-३ अशी आघाडी मिळविली होती. महाराष्ट्राकडून श्रुती शिंदे हिने दोन्ही डावात प्रत्येकी तीन मिनिटे पळतीचा खेळ केला. अश्विानी मोरे (२ मि.२० सेकंद व ३ मि.२० सेकंद), हर्षदा पाटील (२ गडी) यांनीही संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. पंजाबकडून कमलजित कौर (२ मि.४० सेकंद व १ मि.२० सेकंद) व हरमानप्रितकौर (१ मि.५० सेकंद व २ गडी) यांनी दिलेली लढत अपुरी होती. महाराष्ट्राला विजेतेपदासाठी दिल्ली संघाशी खेळावे लागणार आहे. दिल्ली संघाने उपांत्य फेरीत गुजरातला ७-६ असे पाच मिनिटे राखून पराभूत केले. त्यामध्ये प्रामुख्याने मोनू (२ मि. ५० सेकंद व १ मि. ५० सेकंद), मधू (दोन्ही डावांत प्रत्येकी अडीच मिनिटे नाबाद) व नंदिता (दोन्ही डावांत प्रत्येकी २ मि. ४० सेकंद) यांची कामगिरी मोलाची ठरली.

खो खोचे अंतिम सामने गुरुवारी सायंकाळच्या सत्रात होणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment