पुणे । केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये ‘खेलो इंडिया’ युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा स्पर्धांच्या उत्तम नियोजनासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. स्पर्धा उत्तम प्रकारे पार पडावी यासाठी महाराष्ट्रातील क्रीडा अधिकारी काम करीत आहेत.
स्पर्धेसाठी वापरण्यात येणाऱ्या अॅथेलेटिक्स ट्रॅकची अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करण्यात आली असून, ट्रॅकवर विविध खेळाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच वैद्यकीय टीममार्फत नर्स, डॉक्टर आणि प्रशिक्षक यांची देखील काम करण्याची प्रात्यक्षिके घेण्यात आली. खेळादरम्यान एखादा अनुचित प्रकार घडला, तर स्पर्धेची वैद्यकीय टीम सज्ज असायला हवी. यासाठी हे ‘मॉक ड्रील’ करण्यात आले.
दिनांक ८ ते २० जानेवारी २०१९ दरम्यान म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी येथे १८ क्रीडाप्रकारांत ही स्पर्धा होणार आहेत. राज्याचे क्रीडाआयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व कामाचा आढावा घेतला. अग्निशमन दलाचे देखील यावेळी मॉक ड्रील झाले. स्वयंसेवकांना मॉक ड्रीलच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल, उपसंचालक सुधीर मोरे, चंद्रकांत कांबळे, आयोजन समितीचे अधिकारी, स्पोर्ट्स अथॉरिटी आॅफ इंडियाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.
या स्पर्धेत १७ व २१ वर्षांखालील मुले व मुली सहभागी होणार आहेत. देशभरातून भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू/संघ तसेच राष्ट्रीय क्रीडा संघटनेद्वारा आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील संघ/खेळाडू, सी.बी.एस.सी. राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू, तसेच स्पर्धा आयोजक राज्याने निवड केलेले खेळाडू सुमारे १२५०० खेळाडू, तांत्रिक अधिकारी व स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.