पुणे | महाराष्ट्राच्या श्रेया भंगाळे हिने जिम्नस्टिक्समधील वैयक्तिक सर्वसाधारण अॅॅपेरेटस प्रकारात रौप्यपदक मिळविले तर तिची सहकारी क्रिशा छेडा हिला याच प्रकारात ब्राँझपदक मिळाले. सतरा वषार्खालील गटाच्या या स्पर्धेत जम्मू व काश्मिर संघाच्या बावलीन कौर हिने सोनेरी कामगिरी केली.
बावलीन हिने ४३.४० गुणांची कमाई केली. श्रेया हिला ३९.७० गुण मिळाले.
श्रेया ही ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया प्रशालेत शिकत असून तिचे हे पहिलेच पदक आहे. ती पूजा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. क्रिशा ही मुंबईतील जयहिंद महाविद्याालयात शिकत असून ती प्रीमिअर रिदमिक जिम्नॅस्टिक्स अकादमीत सराव करते. तिला वर्षा उपाध्ये व क्षिप्रा जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
क्रिशा हिने गतवर्षी खेलो इंडिया स्पधेर्तील अॅॅपेरेटसपैकी चेंडू प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते.
श्रेया हिने रौप्यपदकाबाबत समाधान व्यक्त करीत सांगितले, माझी ही पहिलीच खेलो इंडिया स्पर्धा असल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.
येथील वातावरण खरोखरीच सर्वांना भारावून टाकणारे आहे. क्रिशा म्हणाली, ब्राँझपदकामुळे मला खूप समाधान झाले आहे. येथील स्पर्धा खूपच चुरशीची होती हे लक्षात घेतल्यास माझी कामगिरी आनंददायीच आहे.