पुणे । वेटलिफ्टिंगमधील १७ वषार्खालील गटात ५५ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या अभिषेक महाजन याने सोनेरी वेध घेतला. त्याने स्नॅचमध्ये ९० किलो तर क्लीन व जर्कमध्ये १२१ किलो असे एकूण २११ किलो वजन उचलले. छत्तीसगढच्या सुभाष लहारे याने अनुक्रमे ९१ किलो व ११४ किलो असे एकूण २०५ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकाविले. गोलम टिकू याने अनुक्रमे ८९ किलो व ११२ किलो असे एकूण २०१ किलो वजन उचलीत ब्राँझपदक जिंकले.
स्पर्धेतील २१ वषार्खालील गटात शुभम कोळेकर याने ५५ किलो गटात क्लीन व जर्कमध्ये विक्रम प्रस्थापित केला. त्याने १३९ किलो वजन उचलीत स्वत: नोंदविलेला १३८ किलो हा विक्रम मोडला. त्याने स्नॅचमध्ये ९७ किलो व एकूणात २३६ किलो वजन उचलून विजेतेपद पटकाविले. तो सांगली येथे संतोष सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याने यापूर्वी विशाखापट्टणम येथे झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत ब्राँझपदक मिळविले होते, तर नागपूर येथे नुकत्याच झालेल्या युवा गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.
महाराष्ट्रच्या प्रशांत कोळी याने येथे ब्राँझपदकाची कमाई करीत संघास आणखी एक पदक मिळवून दिले. त्याने स्नॅचमध्ये १०४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १२१किलो असे एकूण २२५ किलो वजन उचलले. ओडिशाच्या मुन्ना नायक याला रौप्यपदक मिळाले. त्याने २३० किलो वजन उचलले.
ओडिशाच्या भक्ताराम देस्ती याने ४९ किलो वजनी विभागात विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. त्याने क्लीन व जर्कमध्ये १०५ किलो वजन उचलून स्वत नोंदविलेला १०४ किलो हा विक्रम मोडला. त्याने स्नॅचमध्ये ८४ किलो वजन उचलले आणि एकूण १८६ किलो वजन उचलून सोनेरी कामगिरी केली. तामिळनाडूच्या टी.माधवन याने स्नॅचमध्ये ७९ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ९३ किलो असे एकूण १७२ किलो वजन उचलले आणि रौप्यपदक पटकाविले.
त्याचा सहकारी के.गुरु कन्नन याला ब्राँझपदक मिळाले. त्याने स्नॅचमध्ये ७२ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ९३ किलो असे एकूण १६५ किलो वजन उचलले. महाराष्ट्राच्या मुकुंद आहेर याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याने स्नॅचमध्ये ७० किलो तर क्लीन व जर्कमध्ये ९१ किलो असे एकूण १६१ किलो वजन उचलले. या स्पधेर्तील पदक विजेत्यांना आॅलिंपिक रौप्य व ब्राँझपदक विजेता कुस्तीगीर सुशीलकुमार याच्या हस्ते पदक देण्यात आली.