पुणे। महाराष्ट्राच्या दिया चितळे, सृष्टी हेळंगडी व देव श्रॉफ यांनी पात्रता फेरीत विजय मिळवित टेबल टेनिसमध्ये आव्हान राखले.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे.
मुलींच्या १७ वर्षाखालील गटात दिया हिने कर्नाटकच्या आदिती जोशी हिचा ११-९, ११-६, १४-१२ असा पराभव केला. या गटात तेजल कांबळे हिला अनुषा कुटुंबळे या मध्यप्रदेशच्या खेळाडूने ११-८, १४-१२, ११-९ असे हरविले. समृद्धी कुलकर्णी हिला राधाप्रिया गोयल (उत्तरप्रदेश) हिच्याकडून ६-११, १२-१०, २-११, ९-११ असा पराभव पत्करावा लागला. मुलींच्या २१ वर्षाखालील गटात सृष्टी हिने तेलंगणाच्या अकुला श्रिजा हिच्यावर ११-८, ११-९, ११-७ अशी सरळ तीन गेम्समध्ये मात केली.
मुलांच्या १७ वर्षाखालील गटात दीपित पाटील या महाराष्ट्राच्या खेळाडूने दिल्लीच्या आरुष दत्त याचा ११-६, ११-८, ३-११, ११-९ असा पराभव केला. देव श्रॉफ याने अंदमान व निकोबारच्या सॅम्युअल अडवानी याच्यावर ११-५, ११-६, ११-३ असा दणदणीत विजय नोंदविला.






