गुवाहटी। खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मुलींच्या १७ वषार्खालील गटात ४ बाय १०० मीटर्स रिले शर्यत जिंकली आणि अॅथलेटिक्समध्ये नेत्रदीपक कामगिरी केली. महाराष्ट्राला रिलेत आणखी दोन ब्राँझपदकांचीही कमाई झाली. अरनॉल्ड मेंडीसने ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकाविले.
उत्कंठापूर्ण शर्यतीत प्रांजली पाटील, श्रेया शेडगे, सुदेष्णा शिवणकर व सृष्टी शेट्टी यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने रिले शर्यत ४८.३६ सेकंदांत पार केले. गतवर्षी त्यांनी विजेतेपदाची कमाई केली होती. मुलींच्या २१ वर्षाखालील गटात ऋशिका नेपाळी, सिद्धी हिरे, निधी सिंग व कीर्ति भोईटे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने ४ बाय १०० मीटर्स रिले शर्यतीत ब्राँझपदक मिळविले. मुलांच्या २१ वर्षाखालील गटातही महाराष्ट्राला ब्राँझपदक मिळाले. महाराष्ट्र संघात प्रकाश गडदे, विकास खोडके, अरनॉल्ड मेंडीस व प्रसाद अहिरे यांचा समावेश होता.
अरनॉल्डने २१ वर्षाखालील ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रुपेरी कामगिरी करीत आणखी एक पदक मिळविले. त्याने हे अंतर ५३.१७ सेकंदांमध्ये पार केले. तो मुंबई येथे सदाशिव पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. महाराष्ट्राच्या दीपक यादवने याच वयोगटात पोल व्हॉल्टमध्ये ब्राँझपदक जिंकले.
मुलींच्या २१ वर्षाखालील गटात निधी सिंग हिने ४०० मीटर्स अडथळा शर्यतीत ब्राँझपदकाची कमाई केली. तिला हे अंतर पार करण्यास एक मिनिट २.४० सेकंद वेळ लागला. ती येथील ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीतही ब्राँझपदक मिळविले होते. याच वयोगटात नाशिकची आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गा देवरे हिला ८०० मीटर्स धावण्यात ब्राँझपदक मिळाले. तिला हे अंतर पूर्ण करण्यास २ मिनिटे १३.०४ सेकंद वेळ लागला. ती विजेंदरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. विजेंदरसिंग यांचाच शिष्य चैतन्य होलगारे याने २१ वर्षार्खालील गटात ८०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीचे ब्राँझपदक पटकाविले. त्याने ही शर्यत एक मिनिट ५४.६९ सेकंदांत पूर्ण केली.