मलेशियात झालेला २००८ सालचा एकोणीस वर्षाखालील मुलांचा क्रिकेट विश्वचषक म्हणजे नव्या पिढीतील सर्व दिग्गज क्रिकेटपटूंचे उगमस्थान. या विश्वचषकात खेळलेल्या खेळाडूंनी आज जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा बनवलेला दिसून येतो. फलंदाजी असो नाहीतर गोलंदाजी, या विश्वचषकात खेळलेले अनेक खेळाडू अव्वल पाचमध्ये दिसून येतातच.
नव्या पिढीचा सर्वोत्तम फलंदाज म्हटला गेलेला विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा आधारस्तंभ स्टीव्ह स्मिथ, न्यूझीलंडचे नेतृत्व करणारा केन विल्यमसन हे जगातील ‘फॅब फोर’ फलंदाजांत गणले जातात. दुसरीकडे ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी आणि जोस हेजलवूड या गोलंदाजांचा धाक सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहे. त्याचप्रमाणे, या विश्वचषकातून वेस्ट इंडीज क्रिकेटचा पुढील सितारा म्हणला गेलेला, परंतु विश्वचषकातील कामगिरीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप न पाडू शकलेला खेळाडू म्हणजे ‘कायरन पॉवेल’.
किस्वेटरचा साथीदार
कायरनचा जन्म वेस्ट इंडिज बेटावरील नेव्हीस या देशातील. मात्र, वयाच्या १४ ते १६ वयापर्यंत तो इंग्लंडमध्ये राहिला. तिथेच क्रिकेट शिकला. सॉमरसेट येथे खेळत असताना, पुढे इंग्लंडला २०१० टी२० वर्ल्ड कप जिंकून देणारा क्रेग किस्वेटर त्याचा मित्र आणि शालेय संघातून खेळणारा सलामीचा साथीदार होता. लिवर्ड्स आइसलँड या आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व त्याने १६ व्या वर्षीच केले. पुढे त्याला स्टॅनफोर्ड २०-२० लीगमध्ये वयाच्या सतराव्या वर्षी खेळण्याची संधी मिळाली. ही स्पर्धा गाजवल्यानंतर त्याला आपोआपच वेस्ट इंडीजच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघात निवडले गेले.
गाजवला एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक
वेस्ट इंडीजच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघातून खेळताना त्याला २००८ सालच्या विश्वचषकासाठी वेस्ट इंडीज संघात पाचारण केले गेले. हा विश्वचषक अनेक युवा खेळाडूंसाठी ओळखला गेला. मात्र, आपल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर पॉवलने देखील वाहवा मिळवली. त्याने या विश्वचषकात ६ सामने खेळताना दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक २५३ धावा केल्या. त्यावेळी त्याचा स्ट्राईक रेट होता १२४ चार. विशेष म्हणजे सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या विराट कोहलीच्या नावाचा डंका वाजतो त्या विराटने देखील त्यापेक्षा कमी धावा केल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक आणि त्यानंतर लिवर्ड्स आइसलँडसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट गाजवल्यानंतर लवकरच २००९ मध्ये त्याने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याला, २०११ मध्ये कसोटी पदार्पणाची संधी मिळाली ती देखील दिग्गज रामनरेश सरवानच्या जागी. मात्र, त्याचे कसोटी पदार्पण विसरण्यासारखे राहिले कारण ज्यामध्ये तो ३ व ४ असा धावा काढू शकला.
पॉवेलला अनेक संध्या दिल्या गेल्या. यावेळी तो बऱ्याचदा संघाच्या आत बाहेर होत राहिला. राष्ट्रीय संघात नियमित संधी मिळत नसल्याने तसेच फलंदाजीच्या तंत्राविषयी शंका असल्याने त्याने श्रीलंकेत येऊन तमिल युनियन या संघासाठी प्रथमश्रेणी सामने खेळणे सुरू केले. २०१५ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाशी मतभेद झाल्यानंतर त्याने क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.
बेसबॉलपटू कायरन पॉवेल
क्रिकेटमधून विश्रांती घेतल्यानंतर त्याने बेसबॉलमध्ये हात आजमावून पाहिले. त्याने, डिसेंबर २०१५ मध्ये अमेरिकेत जाऊन त्याने बेसबॉलचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. यापूर्वी, कोणताही व्यावसायिक सामना खेळला नसतानाही त्याला प्रतिष्ठित मेजर लीग बेसबॉलमध्ये करार देण्यात आला. त्याने एमएलबीमध्ये मिल्वुकी ब्रेवर्स व न्यूयॉर्क मेट्स संघांचे प्रतिनिधित्व केले. मात्र त्याला बेसबॉलमध्ये तितकेसे यश मिळाले नाही.
क्रिकेटमध्ये पुनरागमन
बेसबॉलमध्ये अपयश आल्यानंतर त्याने पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. लिवर्ड्स आइसलँडसाठी वनडे सामन्यांमध्ये ६४ च्या सरासरीने ५०० धावा काढल्याने त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन सोपे झाले. मात्र, इंग्लंड दौऱ्यावर पुन्हा एकदा तो अपयशी ठरला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानविरुद्ध देखील त्याची तशीच गत झाली. कसोटी मालिकेतही त्याची सरासरी ३० पेक्षा जास्त राहिली नाही. २०१८ च्या बांगलादेश दौऱ्यानंतर मात्र तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाजूला झाला.
प्रशिक्षक म्हणून नवी भूमिका
खेळाडू म्हणून क्रिकेटमधून बाजूला झाल्यानंतर पॉवेलने प्रशिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २०१९ मध्ये अमेरिकेच्या क्रिकेट संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्याने काही काळ काम केले.
कनिष्ठ स्तरावरील क्रिकेट तसेच प्रथमश्रेणी क्रिकेट गाजवल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट तितकेसे यश न मिळालेल्या काही क्रिकेटपटूंमध्ये पॉवेलचा समावेश मात्र झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
“जडेजा बेन स्टोक्सपेक्षा खूप पुढे आहे”, माजी भारतीय क्रिकेटरकडून कौतुकाची थाप
आर अश्विन झाला ‘तीस हजारी’! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘असा’ विक्रम करणारा चौथाच भारतीय