मुंबई । टी 20 क्रिकेटचा उदय झाल्यापासून वेस्ट इंडिजमध्ये एकापेक्षा एक आक्रमक खेळाडूंचा उदय होत आहे. वेस्ट इंडीजचे हे खेळाडू जगातल्या टी 10 अथवा टी 20 क्रिकेटमध्ये धमाका करताना दिसून येत आहेत. फ्रेंचायजी वेस्ट इंडीजच्या खेळाडूंना आपल्या संघात घेण्यास पसंती देतात.
सध्या सेंट लूसिया येथे टी10 ब्लास्ट मालिका सुरू आहे. या स्पर्धेत वेस्ट इंडीजच्या एका 19 वर्षांच्या युवा खेळाडूने धमाकेदार शतकी खेळी करत साऱ्यांनाच प्रभावित केले आहे. 19 वर्षांच्या या नव्या दमाच्या खेळाडूने ही स्फोटक खेळी करून क्रिकेट जगताला ख्रिस गेलची आठवण करून दिली.
किमानी मेलिअस असं या खेळाडूचं नाव असून त्याने दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषकात वेस्ट इंडिजच्या संघाचे नेतृत्व केले होते. विश्वचषकात वेस्ट इंडिजकडून खेळताना त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या.
सेंट लूसिया टी-10 लीग मध्ये ग्रॉस इसलेट केनन ब्लास्ट आणि वियक्स फॉर्ट नॉर्थ रेडर्स यांच्यात सामना झाला. किमानी मेलिअस ग्रॉस इसलेट संघाकडून खेळताना स्फोटक शतकी खेळी करत साऱ्यांनाच चकीत केले आहे.
किमानीने सलामीला खेळताना अवघ्या 34 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी साकारली. यात त्याने 11 षटकार आणि 4 चौकार ठोकले. त्याचा सहकारी टॅरिक गैब्रियलने 50 धावा काढून त्याला चांगली साथ दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 166 धावांची भागीदारी केली. त्यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर ग्रॉस इस्लेट संघाने 10 षटकात तब्बल 166 धावा केल्या.
मेलिअसने डावातील शेवटच्या षटकात सलग पाच षटकार ठोकले. सहाव्या चेंडूवर षटकार खेळण्यातला अपयश आले. शेवटच्या चेंडूवर त्याने चौकार ठोकून एकूण 34 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात वियक्स फॉर्ट नॉर्थ रेडर्स संघास 10 षटकात केवळ 5 बाद 103 धावा करता आल्या. किमानीच्या संघाने या सामन्यात 63 धावांनी सहज विजय मिळवला.