मोंटे कार्लो | क्ले कोर्ट किंग अशी ओळख असणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालने रोलेक्स मोंटे कार्लो मास्टर्स स्पर्धा विक्रमी ११व्यांदा जिंकत मोठा विक्रम केला आहे.
कोणतीही स्पर्धा ११वेळा जिंकणारा तो जगातील पहिला टेनिसपटू ठरला आहे. त्याने आज जपानच्या केन निशीकोरीचा ६-३, ६-२ असा पराभव केला. या स्पर्धेचे एकही सेट न गमावता त्याने पाचव्यांदा विजेतेपद जिंकले आहे.
नदालचे हे एटीपी मास्टर्सचे ३१वे विजेतेपद होते. त्याने आता एटीपी मास्टर्सची सर्वाधिक विजेतेपदं जिंकली असून या यादित जोकोविच ३० विजेतेपदांसह दुसरा तर फेडरर २७ विजेतेपदांसह तिसरा आहे.
२०१७च्या फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीपासून नदालने सलग ३६ सेट क्ले कोर्टवर जिंकले आहेत.
त्याने क्ले कोर्टवर आजपर्यंत ३९६ विजय आणि ३५ पराभव पाहिले आहे. २०१८च्या हंगामात हा खेळाडू ११ सामने जिंकला असून एका सामन्यात पराभूत झाला आहे.
नदालचा हा या स्पर्धेतील ६८वा विजय असून त्याने ४ पराभव पाहिले आहेत.
विशेष म्हणजे कोणत्याही खेळाडूला एटीपीच्या स्पर्धांमध्ये एकाच स्पर्धेचे विजेतेपद १० वेळा जिंकता आले नाही. नदालने रोलेक्स मोंटे कार्लो मास्टर्स ११ वेळा, फ्रेंच ओपन १० वेळा तसेच बार्सेलोना ओपनही १० वेळा जिंकली आहे.
त्याचे हे एटीपीचे ७६ वे विजेतेपद होते. यातील ५४ विजेतेपदं त्याने क्ले कोर्टवर मिळवली आहेत.
एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी राहण्यासाठीही नदालला या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणे गरजेचे होते आणि आज त्याने ते करून दाखवले.
राफेल नदाल
३१- सर्वाधिक एटीपी मास्टर्सची विजेतेपदं
११- एकाच स्पर्धेची सर्वाधिक विजेतेपद
१- एटीपी क्रमवारीत अव्वल स्थान कायम केले. pic.twitter.com/D6KBqIf1Nu— Sharad Bodage (@SharadBodage) April 22, 2018