आयपीएल २०२१ चा एलिमिनेटरसाठीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, सुनील नरेनच्या घातक गोलंदाजीने आरसीबीला १३८ धावांवर रोखले. त्यांनंतर केकेआरने १३९ धावांचे आव्हान चार गडी राखून पूर्ण करत आरसीबीवर विजय मिळवला. या विजयासह केकेआरने क्वालिफायर २ सामन्यात प्रवेश केला.
एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवण्याची केकेआरची ही पहिली वेळ नाही. याआधीही केकेआरने एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवला होता. सन २०१७ मध्ये सनरायझरर्स हैदराबादला हरवून त्यांनी पुढच्या सामन्यात प्रवेश केला होता. त्यांनंतर पुढच्याच मोसमात म्हणजेच २०१८ च्या हंगामात देखील राजस्थान रॉयल्सचा एलिमिनेटर सामन्यात पराभव केला होता. कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलमधील असा एकमेव संघ आहे, ज्यांनी तीन वेळा एलिमिनेटर सामन्यात विजय प्राप्त केला आहे.
केकेआरने सोमवारी (११ ऑक्टोबर) आरसीबी विरुद्ध एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवून आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळण्याचे स्वप्न जिवंत ठेवले आहे. पण त्याआधी त्यांना क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी भिडावे लागणार आहे.
एलिमिनेटर सामन्यात नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय केकेआरच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. संघाच्या ४९ धावा झाल्या असताना देवदत्त पेडिकल बाद झाला त्याने १८ चेंडूत २१ धावा केल्या. या खेळीत त्याने दोन चौकार लगावले. त्यानंतर आलेला श्रीकर भरत १६ चेंडूत अवघ्या ९ धावा करून माघारी परतला. त्याला सुनील नरेनने बाद केले.
त्यांनंतर नरेनने विराट कोहलीला ३९ धावांवर बाद करत आरसीबीला अजून एक धक्का दिला. विराटने आपल्या खेळीत पाच चौकार लागावले. या हंगामात सहा अर्धशतके झळकावणारा मॅक्सवेलही काही खास कामगिरी करू शकला नाही तो अवघ्या १५ धावा करून बाद झाला. त्याने १८ चेंडूंचा सामना करत एक चौकार लगावला. मॅक्सवेललाही नरेनच बाद केले. त्यांनंतर फलंदाजीसाठी आलेल्या डिव्हिलर्सलाही नरेनने चालते केले. त्याने ९ चेंडूत ११ धावा केल्या. शाहबाझ अहमद आणि क्रिस्टिएन विशेष काही करू शकले नाही. तर हर्षल पटेल आठ धावांवर नाबाद राहिला.
सुनील नरेनच्या घातक गोलंदाजीने आरसीबीचे कंबरडे मोडले. त्याने २१ धावात चार गडी बाद केले. त्याला लॉकी फर्ग्युसनने चांगली साथ दिली त्याने ३० धावात दोन गडी बाद केले. आरसीबीने निर्धारित २० षटकात १३८ धावा केल्या.
केकेआरने १३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सांघिक खेळ दाखवत चार गडी राखून सामना जिंकला. केकेआरकडून शुबमन गिलने सर्वाधिक २९ धावांची खेळी केली. तसेच व्यंकटेश अय्यर आणि सुनील नरेनने प्रत्येकी २६ धावांची खेळी केली. नरेनने त्याच्या खेळीत ३ षटकार ठोकले. तसेच नितीश राणाने २३ धावांचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या –
ट्रॉफीचे अखेर स्वप्नच राहिले! नकोश्या विक्रमासह कोहलीच्या नेतृत्व कारकिर्दीची अखेर
विराटचा आरसीबीच्या कर्णधारपदाला ‘गुडबाय’; १४० सामन्यांत नेतृत्व करताना ‘अशी’ राहिली कामगिरी






