---Advertisement---

KKR vs DC, Live: राणा-नारायणच्या आक्रमणामुळे कोलकाताचा सहज विजय; दिल्लीचा ३ विकेट्सने पराभव

On: मंगळवार, सप्टेंबर 28, 2021 7:20 PM
---Advertisement---

शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४१ वा सामना मंगळवारी (२८ सप्टेंबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात कोलकाताने ३ विकेट्सने सामना जिंकला. या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांनी दिल्लीला २० षटकांत ९ बाद १२७ धावांवर रोखले. त्यामुळे कोलकाता समोर विजयासाठी १२८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग कोलकाताने १८.२ षटकांत ७ विकेट्स गमावत सहज पूर्ण केला.

मोक्याच्या क्षणी राणा-नारायणचे आक्रमण 

कोलकाताकडून १२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर हे दोघे सलामीला फलंदाजीला उतरले होते. या दोघांनी कोलकाताला चांगली सुरुवात करुन दिली होती. पण ५ व्या षटकात अय्यर १४ धावा करुन ललित यादवच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. पाठोपाठ राहुल त्रिपाठीला अवेश खानने ९ धावांवर ६ व्या षटकात बाद केले.

यानंतर शुबमन गिलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तोही ११ व्या षटकात ३० धावांवर कागिसो रबाडाविरुद्ध खेळताना बाद झाला. पाठोपाठ पुढच्याच षटकात कर्णधार ओएन मॉर्गनला आर अश्विनने शून्यावर बाद केले. पण, यानंतर नितीश राणाने आक्रमक खेळत कोलकाताचे आव्हान कायम ठेवले. मात्र, दुसऱ्या बाजूने फलंदाजी करत असलेला दिनेश कार्तिक १५ व्या षटकात अवेश खानच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.

पण, तो बाद झाल्यानंतर फळंदाजीसाठी आलेल्या सुनील नारायणनेही आक्रमक पवित्रा घेतला. त्याने १६ व्या षटकात कागिसो रबाडाविरुद्ध २ षटकार आणि १ चौकार मारला. त्यामुळे कोलकाता विजयाच्या समीप पोहोचले. पण नारायण १७ व्या षटकात १० चेंडूत २१ धावा करुन बाद झाला. त्याला एन्रीच नॉर्किएने अक्षर पटेल करवी झेलबाद केले. त्याच्या पुढच्याच षटकात टीम साऊथीला ३ धावांवर अवेश खानने त्रिफळाचीत करत दिल्लीला ७ वा धक्का दिला.

मात्र, अखेर नितीश राणाने १९ व्या षटकात चौकार ठोकला आणि कोलकाताला विजय मिळवून दिला. राणाने २७ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार मारत नाबाद ३६ धावांची खेळी केली.

कोलकाताच्या गोलंदाजांची शानदार कामगिरी

या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीकडून सलामीला स्टीव्ह स्मिथ आणि शिखर धवन यांची जोडी उतरली. या दोघांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र, शिखरला लॉकी फर्ग्यूसनने ५ व्या षटकात २४ धावांवर व्यंकटेश अय्यरकरवी झेलबाद केले. शिखरने २४ धावा केल्या.

त्याच्या पाठोपाठ ७ व्या षटकात सुनील नारायणने श्रेयस अय्यरला १ धावेवर त्रिफळाचीत केले. यानंतर मात्र, स्मिथने रिषभ पंतच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची जोडी फर्ग्यूसनने तोडली. त्याने स्मिथला १३ व्या षटकात ३९ धावांवर बाद केले. त्यानंतर शिमरॉन हेटमायरही १४ व्या षटकात ४ धावा करुन व्यंकटेश अय्यरच्या गोलंदाजीवर टीम साऊथीकडे झेल देऊन बाद झाला.

यानंतरही कोणी फार काळ टीकू शकले नाहीत. १५ व्या षटकात ललीत यादवला सुनील नारायणने पायचीत केले. तर पुढच्याच षटकात अक्षर पटेलही व्यंकटेश अय्यरच्या गोलंदाजीवर लॉकी फर्ग्यूसनकडे झेल देऊन बाद झाला. या दोघांनाही भोपळाही फोडता आला नाही. यानंतर आर अश्विनने रिषभ पंतला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण अखेरच्या षटकात टीम साऊथीने अश्विनला ९ धावांवर बाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर पंत ३९ धावांवर धावबाद झाला. तर याच षटकात अवेश खान ५ धावा करुन धावबाद झाला. त्यामुळे २० षटकात दिल्लीला ९ बाद १२७ धावाच करता आल्या.

असे आहेत दोन्ही संघ

या सामन्यासाठी कोलकताने त्यांच्या अंतिम ११ जणांच्या संघात टीम साऊथीला आंद्रे रसल ऐवजी संधी दिली आहे. साऊथीचे हे कोलकाताकडून पदार्पण असेल. त्याला आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी पॅट कमिन्सचा बदली खेळाडू म्हणून कोलकाताने संघात सामील केले होते. तसेच मंगळवारच्या सामन्यासाठी प्रसिद्ध कृष्णाच्या ऐवजी संदीप वॉरियरचा अंतिम ११ जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

दिल्लीने या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात एकच बदल केला आहे. त्यांनी दुखापतग्रस्त पृथ्वी शॉ ऐवजी स्टीव्ह स्मिथला संधी दिली आहे.

असे आहेत ११ जणांचे संघ – 

दिल्ली कॅपिटल्स: शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, ललित यादव, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, एन्रिच नॉर्किए, अवेश खान

कोलकाता नाईट रायडर्स: शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, ओएन मॉर्गन (कर्णधार), नितीश राणा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुनील नारायण, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊथी, वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---