इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 68वा सामना कोलकाता नाईट रायडर्स वि. लखनऊ सुपर जायंट्स संघात खेळला गेला. शनिवारी (दि. 20 मे) ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या या सामन्यात केकेआरला 1 धावेने पराभवाचे तोंड पाहावे लागले, तर लखनऊने प्ले-ऑफमधील स्थान पक्के केले. मात्र, खरी मैफील रिंकू सिंग याने लुटली. रिंकूच्या विस्फोटक फलंदाजीनंतर केकेआरचा कर्णधार नितीश राणा याने त्याचे कौतुक केले. चला तर रिंकूबाबत राणा काय म्हणालाय जाणून घेऊयात…
लखनऊ सुपर जायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 176 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाला 20 षटकात 7 विकेट्स गमावत 175 धावा केल्या. यामध्ये रिंकू सिंग (Rinku Singh) याच्या 33 चेंडूत 67 धावांचा समावेश होता. या धावा करताना रिंकूने 4 षटकार आणि 6 चौकारांची बरसात केली होती. रिंकूने सामन्याचा शेवट अखेरच्या चेंडूवर षटकार मारत केला. मात्र, यावेळी केकेआर संघ एक धाव करण्यात अपयशी ठरला. या पराभवानंतर केकेआरचा कर्णधार नितीश राणा रिंकू सिंग (Nitish Rana Rinku Singh) याचे कौतुक करत मोठी गोष्ट बोलून गेला.
‘आमच्या संघात अव्वल 4मध्ये साखळी फेरी संपवण्याची क्षमता होती’
नितीश राणा (Nitish Rana) याने पराभवानंतर म्हटले की, “मला माहिती आहे की, निकाल आमच्या बाजूने गेला नाही. मात्र, स्पर्धेत अनेक सकारात्मक गोष्टी मिळाल्या आहेत. आम्ही पुढे सुधारणा करू आणि फलंदाजी संघासोबत येऊ.” ड्रेसिंग रूममध्ये काय चर्चा होते? या प्रश्नावर राणा म्हणाला की, “जेव्हा तुम्हाला जगातील सर्वोत्तम लीगमध्ये प्रदर्शन करायचे असते, तेव्हा तुम्हाला तिन्ही विभागात चांगली कामगिरी करावी लागते. मला वाटते की, आमच्या संघामध्ये साखळी फेरीचा शेवट अव्वल 4मध्ये करण्याची क्षमता होती. कर्णधार म्हणून मला वाईट वाटत आहे.”
रिंकूचे कौतुक
रिंकूविषयी बोलताना राणा म्हणाला की, “14 सामन्यात 14 वेळा मी जेव्हाही माईक पकडला, तेव्हा मी रिंकू सिंग याचीच चर्चा केली आहे. तो माझ्या खूपच जवळ आहे. त्याने इथपर्यंत पोहोचण्यात खूप मेहनत घेतली आहे. संपूर्ण देशाला माहितीये की, त्याने काय केले आहे. जेव्हा त्याने असे केले, तेव्हा तो काहीही करू शकतो.”
या विजयानंतर लखनऊ संघाने गुणतालिकेत 17 गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आणि प्ले-ऑफसाठी क्वालिफाय केले. तसेच, केकेआरच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. आता लखनऊ संघ एलिमिनेटर सामना खेळताना दिसणार आहे. (kkr vs lsg skipper nitish rana praised rinku singh after close loss in eden gardens)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नवीनच्या ओव्हरमध्ये रिंकूचे तांडव! ठोकला थेट 110 मीटर लांबीचा सिक्स, गोलंदाजाने रडल्यासारखं केलं तोंड
‘तुम्ही त्याला हलक्यात…’, 33 चेंडूत 67 धावा चोपणाऱ्या रिंकूबाबत LSGचा कर्णधार कृणालचे लक्षवेधी भाष्य