दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात शुक्रवारी (३० सप्टेंबर) खेळवला गेला. या सामन्यात पंजाबने ५ विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे त्यांनी प्लेऑफच्या शर्यतीतील आपले स्थान आणखी भक्कम केले आहे. तसेच त्यांच्या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सचा मात्र मोठा फायदा झाला असून ते प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. चेन्नई सुपर किंग्सनंतर आयपीएल २०२१ प्लेऑफसाठी पात्र ठरणारा दिल्ली दुसरा संघ ठरला.
या सामन्यात कोलकाताने २० षटकांत ७ बाद १६५ धावा केल्या आणि पंजाबसमोर १६६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग पंजाबने १९.३ षटकांत ५ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केला. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने अर्धशतकी खेळी केली.
पंजाबकडून १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कर्णधार केेएल राहुल आणि मयंक अगरवाल यांची सलामी जोडी मैदानात उतरली. या दोघांनी पंजाबला दमदार सुरुवात करुन दिली. त्यांनी अर्धशतकी सलामी भागीदारी केली. अखेर ही भागीदारी तोडण्यात ९ व्या षटकात वरुण चक्रवर्तीला यश आले. त्याने मयंकला ४० धावांवर ओएन मॉर्गनकडे झेल देण्यास भाग पाडले.
त्यानंतर लगेचच ११ व्या षटकात वरुणने निकोलस पूरनला १२ धावांवर बाद करत पंजाबला दुसरा धक्का दिला. त्यानंतर एडेन मार्करमने केएल राहुलला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण, त्यालाही १६ व्या षटकात सुनील नारायणने शुबमन गिलकरवी १८ धावांवर बाद केले. तर, १७ व्या षटकात दिपक हुडा ३ धावांवर शिवम मावीच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीकडे झेल देऊन बाद झाला. त्यामुळे पुन्हा सामन्यात रोमांच आला.
पण, यादरम्यान राहुलने आयपीएल २०२१ मधील त्याचे ५ वे अर्धशतक झळकावले होते. केएल राहुलला १९ व्या षटकात झेलबाद देण्यात आले होते, पण त्यावेळी क्षेत्ररक्षकाने झेल घेण्यापूर्वी चेंडूचा मैदानाला स्पर्श झाल्याचे लक्षात आल्याने त्याला पुन्हा नाबाद देण्यात आले.
पण, शेवटी त्याला अखेरच्या षटकात व्यंकटेश अय्यरने बाद केले. केएल राहुलने ५५ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. तो बाद झाला तेव्हा ४ चेंडूत ४ धावांची पंजाबला गरज होती. त्यावेळी षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर शाहरुख खानचा झेल राहुल त्रिपाठीकडून बाऊंड्री लाईनजवळ सुटला आणि तो चेंडू षटकार गेला. त्यामुळे पंजाबच्या विजयावरही शिक्कामोर्तब झाले.
कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच शिवम मावी, व्यंकटेश अय्यर आणि सुनील नारायणने प्रत्येकी १ विकेट घेतली.
व्यंकटेश अय्यरचे अर्धशतक
या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोलकाता संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिलने डावाची सुरुवात केली होती. पण, गिलला तिसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने ७ धावांवर त्रिफळाचीत करत मोठा धक्का दिला. पण यानंतर अय्यरने राहुल त्रिपाठीसह शानदार फलंदाजी करताना संघाचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारीही केली.
या दोघांची भागीदारी रंगत असतानाच रवी बिष्णोईने दीपक हुडाकरवी त्रिपाठीला झेलबाद केले. त्याने २६ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. त्याच्या बाद होण्याने दुसऱ्या विकेटसाठीची ७२ धावांची भागीदारी तुटली. पण, यानंतर १३ व्या षटकात व्यंकटेश अय्यरने त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
पण, अर्धशतकानंतर तो १५ व्या षटकात रवी बिष्णोईच्या गोलंदाजीवर दीपक हुडाकडे झेल देऊन बाद झाला. त्याने ९ चौकार आणि १ षटकार मारला. त्याच्यानंतर कोलकाताच्या फलंदाजांना एकामागोमाग विकेट्स गमावल्या. १६ व्या षटकात कोलकाताचा कर्णधार ओएन मॉर्गनला मोहम्मद शमीने २ धावांवर पायचीत केले. १८ व्या षटकात नितीश राणाने १८ चेंडूत ३१ धावा करुन विकेट गमावली. त्याच्यापाठोपाठ १९ व्या षटकात पदार्पणवीर टीम सिफर्ट २ धावांवर धावबाद झाला, तर २० व्या षटकात अखेरच्या चेंडूवर दिनेश कार्तिक ११ धावांवर अर्शदीप विरुद्ध खेळताना त्रिफळाचीत झाला.
पंजाबकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच रवी बिष्णोईने २ आणि मोहम्मद शमीने १ विकेट घेतली.
असे आहेत दोन्ही संघ
या सामन्यासाठी कोलकाताने अंतिम ११ जणांच्या संघात टीम सिफर्टला संधी दिली आहे. त्यामुळे तो कोलकाताकडून पदार्पण करत आहे. त्याला दुखापतग्रस्त लॉकी फर्ग्यूसनऐवजी संधी मिळाली आहे. तसेच शिवम मावीला संदीप वॉरियरऐवजी अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली आहे.
तसेच पंजाबला या सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला होता. बायो-बबलमुळे थकवा आल्याचे सांगत ख्रिस गेलने उर्वरित आयपीएल २०२१ हंगामातून माघार घेतली आहे. त्यामुळे तो या सामन्यापासून पंजाबचा भाग नाही. त्याच्याऐवजी फॅबियन ऍलेनला अंतिम ११ जणांच्या संघात संधी देण्यात आली असून मयंक अगरवालही संघात परतला आहे. त्याचबरोबर शाहरुख खानलाही कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळाली आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ –
कोलकाता नाईट रायडर्स: शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, ओएन मॉर्गन (कर्णधार), नितीश राणा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), टीम सिफर्ट, सुनील नारायण, शिवम मावी, टीम साऊथी, वरुण चक्रवर्ती.
पंजाब किंग्ज: केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मयंक अगरवाल, एडेन मार्करम, निकोलस पूरन, शाहरुख खान, दीपक हुडा, फॅबियन ऍलन, नॅथन एलिस, मोहम्मद शमी, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग