दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ मध्ये रविवारी (३ ऑक्टोबर) डबल हेडरचा रोमांच रंगला. या दिवसातील दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने ६ विकेट्सने विजय मिळवला.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने २० षटकात ८ बाद ११५ धावा केल्या आणि कोलकातासमोर ११६ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग कोलकाता नाईट रायडर्सने १९.४ षटकात ४ विकेट्स गमावत ११९ धावा करुन पूर्ण केला.
कोलकाताकडून ११५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यरची जोडी सलामीला फलंदाजीसाठी उतरली. या दोघांनी चांगली सुरुवात केली. पण अय्यर ८ धावांवर ५ व्या षटकात जेसन होल्डविरुद्ध खेळताना बाद झाला. त्याच्यापाठोपाठ राशिद खानने राहुल त्रिपाठीला ७ व्या षटकात ७ धावांवर बाद केले. पण त्यानंतर नितीश राणाने शुबमन गिलला भक्कम साथ दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत विजयाचा पाया रचला. दरम्यान गिलने वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केले.
पण, या दोघांची जोडी सिद्धार्थ कौलने १७ व्या षटकात तोडली. त्याने शुबमन गिलला जेसन होल्डरकडे झेल देण्यास भाग पाडले. शुबमनने ५१ चेंडूत १० चौकारांसह ५७ धावा केल्या. त्यापाठोपाठ १८ व्या षटकात जेसन होल्डरने नितीश राणाला २५ धावांवर बाद केले. पण त्यानंतर दिनेश कार्तिकने कोलकाताना विजयापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी घेतली आणि अखेरच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार मारत पूर्ण केली. दिनेश कार्तिक १२ चेंडूत १८ धावांवर नाबाद राहिला. तर कर्णधार मॉर्गन २ धावांवर नाबाद राहिला.
हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या, तर सिद्धार्थ कौल आणि राशिद खानने प्रत्येकी १ विकेट घेतली.
कोलकाताचे गोलंदाज चमकले
या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, कोलकाताने सुरुवातीपासूनच हैदराबादच्या फलंदाजांवर वर्चस्व ठेवले. हैदराबादकडून जेसन रॉय आणि वृद्धिमान साहाने सलामीला फलंदाजी केली. पण साहा पहिल्याच षटकात टीम साऊदी विरुद्ध खेळताना शुन्यावर बाद झाला. शिवम मावीने रॉलला चौथ्या षटकात १० धावांवर बाद केले.
त्यानंतर केन विलियम्सनला प्रियम गर्गने साथ देण्याचा प्रयत्न केला. पण विलियम्सन ७ व्या षटकात २६ धावांवर धावबाद झाला. त्यानंतरही गर्गने अभिषेक शर्माला साथीला घेत साव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ११ व्या षटकात अभिषेकला शाकिब अल हसनने ६ धावांवर बाद केले.
पाठोपाठ १५ व्या षटकात २१ धावा करुन प्रियम गर्ग वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर जेसन होल्डर (२) आणि राशिद खान (८) धावांवर बाद झाले. अब्दुल सामदने २५ धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला साऊदीने बाद केले. अखेर भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल प्रत्येकी नाबाद ७ धावा केल्या. त्यामुळे सनरायझर्सला २० षटकात ११५ धावाच करता आल्या.
कोलकाताकडून टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच शाकिब अल हसनने १ विकेट घेतली.
असे आहेत ११ जणांचे संघ –
कोलकाता नाईट रायडर्स: शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, ओएन मॉर्गन (कर्णधार), शाकिब अल हसन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुनील नारायण, शिवम मावी, टीम साउदी, वरुण चक्रवर्ती
सनरायझर्स हैदराबाद: जेसन रॉय, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केन विल्यमसन (कर्णधार), प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल सामद, जेसन होल्डर, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, सिद्धार्थ कौल.