इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या हंगामातील १४वा सामना बुधवारी (०६ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. हा सामना पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात कोलकाताने ५ विकेट्सने विजय मिळवला. कोलकाताच्या विजयाचा शिल्पकार पॅट कमिन्स ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, तब्बल ५वेळा आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या मुंबईला या हंगामात सलग तिसऱ्या पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तसेच, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाला संघर्ष करावा लागला. त्यांनी निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत १६१ धावा केल्या. मुंबईने दिलेल्या १६२ धावांचे आव्हान कोलकाता संघाने ५ विकेट्स गमावत सहजरीत्या १६ षटकातच पूर्ण केले.
यावेळी कोलकाताकडून फलंदाजी करताना पॅट कमिन्सने (Pat Cummins) कहर फलंदाजी केली. त्याने अवघ्या १५ चेंडूत ५६ धावा केल्या. विशेष म्हणजे, त्याने १४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या धावा करताना त्याने ४ चौकार आणि ६ षटकार ठोकले. त्याच्याव्यतिरिक्त वेंकटेश अय्यरनेही अर्धशतकी खेळी केली. त्याने १ षटकार आणि ६ चौकार मारले. या दोघांव्यतिरिक्त कुणालाही २० धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार श्रेयस अय्यरदेखील फक्त १० धावा करत तंबूत परतला. मात्र, या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता संघाने शानदार विजय मिळवला.
Player of the Match is none other than @patcummins30 for his stupendous knock of 56* off just 15 deliveries as @KKRiders win by 5 wickets.
Scorecard – https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/0WI5Y81XgL
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
यावेळी मुंबई संघाकडून गोलंदाजी करताना मुरुगन अश्विन आणि टायमल मिल्स या दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, डॅनियल सॅम्सही १ विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाकडून हंगामातील पहिलाच सामना खेळत असलेल्या सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३६ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त तिलक वर्माने ३८, पदार्पणवीर ‘बेबी एबी’ म्हणजेच डेवाल्ड ब्रेविसने २९ आणि कायरन पोलार्डने २२ धावा केल्या. इशान किशनला फक्त १४ धावा करता आल्या, तर कर्णधार रोहित शर्मा केवळ २ धावा करून बाद झाला.
यावेळी कोलकाता संघाकडून पॅट कमिन्सने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही जलवा दाखवला. त्याने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त वरुण चक्रवर्ती आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एक विकेट आपल्या खिशात घातली.
कोलकाता नाईट रायडर्सचा हा या हंगामातील तिसरा विजय होता. त्यांनी आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. त्यातील फक्त १ सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर ते गुणतालिकेत ६ गुणांसह अव्वलस्थानी आहेत. दुसरीकडे मुंबईने गुणतालिकेत नववा क्रमांक गाठला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी! ‘हे’ दोन खेळाडू संघात आल्याने मिटणार फलंदाजी अन् गोलंदाजीची कटकट
KKR vs MI | नाणेफेक जिंकत श्रेयसचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, दोन नव्या बदलांसह दोन्ही संघ सज्ज
अरेरे! मोठ्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त, वाढवली संघाची चिंता