पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 287 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली आहे.
भारताने दुसऱ्या डावात पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर सलामीवीर फलंदाज केएल राहुलची विकेट गमावली आहे. राहुलला आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने त्रिफळाचीत केले. राहुलला या डावात भोपळाही फोडता आलेला नाही.
राहुल या सामन्यातील पहिल्या डावातही जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर 2 धावांवर त्रिफळाचीत झाला आहे.
राहुल एकाच कसोटी सामन्यात दोन्ही डावात त्रिफळाचीत होण्याची ही तिसरी वेळ होती. त्यामुळे त्याने भारतीय सलामीवीरांनी कसोटीमध्ये सर्वाधिकवेळा एका सामन्यात दोन्ही डावात त्रिफळाचीत होण्याच्या सुनील गावसकरांच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली आहे.
गावसकर त्यांच्या कारकिर्दीत 125 कसोटी सामने खेळले असून यात ते तीन सामन्यातील दोन्ही डावात त्रिफळाचीत झाले आहेत. तसेच राहुलने आत्तापर्यंत फक्त 33 कसोटी सामन्यात हा विक्रम केला आहे. तसेच केएल राहुलची मागील 11 डावातील त्रिफळाचीत होण्याची ही सातवी वेळ आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–एकीकडे टीम इंडिया धावांसाठी झगडत असताना हार्दिक पंड्या रणजी ट्राॅफीत धडका सुरुच
–पंजाबच्या ‘ज्यूनियर युवराज’ने द्विशतक करत केली या मोसमातील सर्वोत्तम खेळी
–आयपीएल लिलावाच्या एक दिवसाआधीच युवराज सिंगची दमदार अष्टपैलू कामगिरी