आयपीएल २०२१ मध्ये रविवारी (१८ एप्रिल) पहिल्यांदा डबल हेडर म्हणजे एकाच दिवशी दोन सामने खेळले गेले. यातील दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुलने स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक साजरे केले. या अर्धशतकासह राहुलने अनेक दिग्गजांना मागे टाकत एका खास यादीत अव्वल स्थान पटकावले.
राहुलने झळकावले दमदार अर्धशतक
नाणेफेक गमावल्यानंतर पंजाबला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. कर्णधार केएल राहुल व मयंक अगरवाल यांनी संघाला तुफानी सुरुवात देत १२२ धावा फटकावल्या. मयंक अगरवाल ६९ धावा परतल्यानंतर राहुलनेही स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने ५१ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ६१ धावा बनविल्या.
अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज
या अर्धशतकासह राहुलने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आत्तापर्यंत २५ वेळा ५० पेक्षा अधिक धावांचा टप्पा पार केला. त्याने ८४ सामन्यातील ७५ व्या डावात ही कामगिरी केली. आयपीएलमध्ये पहिल्या ७५ डावात सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा बनवणारा तो अव्वल फलंदाज बनला. दुसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्सचाच ख्रिस गेल आहे. गेलने आपल्या आयपीएल कारकीर्दीच्या सुरुवातीच्या ७५ डावात २३ वेळा अर्धशतकाची वेस ओलांडलेली.
या यादीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर दोन ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आहेत. शॉन मार्श व डेव्हिड वॉर्नर यांनी आयपीएल कारकिर्दीच्या पहिल्या ७५ डावांमध्ये प्रत्येकी २१ वेळा अर्धशतकापेक्षा जास्त धावा बनवलेल्या. सध्या दिल्ली कॅपिटल्सचा भाग असलेला अजिंक्य रहाणे व कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीर यांनी आयपीएलमध्ये पहिल्या ७५ डावात १८ वेळा अशी कामगिरी नोंदवलेली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘उडता डॅनियल!’ बदली फिल्डर म्हणून आलेल्या ख्रिस्टियनने घेतला शुभमन गिलचा घेतला लाजवाब
आश्चर्यम! चौदा वर्षात आरसीबीने पहिल्यांदा केली ‘अशी’ कामगिरी
राहुल-मयंकची जोडी लय भारी! दिल्ली विरूद्ध तोडला ५ वर्षे जुना विक्रम