इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. या हंगामाच्या साखळी फेरी सामन्यांतील ५३ वा सामना गुरुवारी (०७ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झाला. या सामन्यात सर्वांआधी प्लेऑफच्या शर्यतीत पात्र ठरलेला चेन्नई संघ पंजाबच्या हातून ६ विकेट्सने पराभूत झाला. त्यांच्या पराभवास कारण ठरला पंजाबचा कर्णधार केएल राहुल. राहुलने नाबाद ९८ धावांची ताबडतोब खेळी करत चेन्नईच्या पूर्ण संघाची दमछाक करुन सोडली. आपल्या या शानदार खेळीसह त्याने मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित २० षटकांत ६ विकेट्सच्या नुकसानावर १३४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाब संघाला फक्त ४६ धावांवर पहिला धक्का बसला. सलामीवीर मयंक अगरवाल १२ धावांवर शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर पायचित झाला. मयंकनंतर इतर फलंदाजही चेन्नईच्या गोलंदाजांपुढे तग धरू शकले नाहीत. मात्र एका बाजूने विकेट्स जात असताना राहुलने डावाखेर नाबाद राहत कर्णधार खेळी केली.
त्याने सलामीला फलंदाजीला येत ४२ चेंडूंमध्ये ८ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ९८ धावा चोपल्या आणि १३ व्या षटकात संघाला विजय मिळवून दिला. अवघ्या २ धावांनी त्याचे आयपीएलमधील शतक हुकले. परंतु ९८ धावांची खेळी करत तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा धावांची नव्वदी गाठणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने आतापर्यंत सर्वाधिक ५ वेळा आयपीएलमध्ये ९० ते ९९ धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर शिखर धवन ४ वेळा हा पराक्रम करू शकला आहे.
एकूण पाहायचे झाल्यासही, राहुलच या विक्रमात अव्वलस्थानी आहे. त्याच्याबरोबर सनरायझर्स हैदराबादचा डेविड वॉर्नर संयुक्तपणे अव्वलस्थानी आहे. तर शिखर धवन (४ वेळा), ख्रिस गेल (४ वेळा) आणि विराट कोहली (४ वेळा) संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
इतकेच नव्हे तर, राहुल आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ९० च्या धावसंख्येवर नाबाद राहणारा फलंदाजही बनला आहे. नाबाद ९८ धावांची खेळी करण्यापूर्वी त्याने आयपीएलमध्ये ९१ आणि ९५ धावांवर नाबाद राहण्याचा कारनामा केला आहे. त्याच्याबरोबर विराट कोहली आणि शिखर धवन हे दोघेही आयपीएलमध्ये प्रत्येकी ३ वेळा ९०-९९ धावांवर नाबाद राहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
किती गोड! पंचांनी जडेजाबाबत दिला ‘तो’ निर्णय अन् इकडे नाचू लागली झिवा, रैनाही पाहून हसला
आनंदी आनंद गडे! दीपक चाहरच्या साखरपुड्याचे चेन्नईकडून जोरदार सेलिब्रेशन; धोनी, रैनाचीही मस्ती
विरोधी संघाला १०० धावांच्या आत ऑलआऊट करण्यात ‘या’ ३ संघांचा दबदबा, केकेआर अव्वल स्थानी