---Advertisement---

विक्रमवीर राहुल! तुफानी अर्धशतकासह मोडून काढली विराटची तीन विश्वचषकांतील मक्तेदारी

On: सोमवार, नोव्हेंबर 8, 2021 11:19 PM
---Advertisement---

संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे होत असलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाने एका शानदार विजयासह स्पर्धेला निरोप दिला. नामिबिया विरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने ९ गडी राखून मोठा विजय मिळवला. भारतीय संघाने विजय मिळविला असला तरी, त्यांची उपांत्य फेरीत जाण्याची संधी केव्हाच हुकली होती. या सामन्यात सलामीवीर केएल राहुलने दमदार अर्धशतक ठोकत एका नव्या विक्रमासह विराट कोहलीची मक्तेदारी मोडून काढली.

राहुलचे आणखी एक अर्धशतक
या सामन्यात नामिबियाने ठेवलेले १३३ धावांचे आव्हान पूर्ण करताना केएल राहुलने ३६ चेंडूवर ४ चौकार व दोन षटकार खेचत १५० च्या स्ट्राईक रेटने नाबाद ५४ धावा चोपल्या. त्याचे हे स्पर्धेतील दुसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने अफगाणिस्तान विरूद्ध १९ चेंडूवर अर्धशतक साजरे केले होते.

मोडला विराटचा तो मोठा विक्रम
आपला पहिला टी२० विश्वचषक खेळत असलेला राहुल या स्पर्धेमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने पाच सामन्यांच्या पाच डावात १९४ धावा केल्या. यासह त्याने सलग तीन विश्वचषकात चालत आलेली विराट कोहलीचे मक्तेदारी मोडून काढली. विराटने २०१२ टी२० विश्वचषकात १८५, २०१४ टी२० विश्वचषकात ३२९ व २०१६ टी२० विश्वचषकात २७३ धावा केलेल्या.

दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या पहिल्या वहिल्या २००७ टी२० विश्वचषकात गौतम गंभीरने भारतासाठी २२७ धावा, २००९ टी२० विश्वचषकात युवराज सिंगने १५३ व २०१० टी२० विश्वचषकात सुरेश रैनाने सर्वाधिक २१९ धावा केलेल्या.

भारतीय संघाची विजयी अखेर
पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने या स्पर्धेत पुनरागमन करत अफगाणिस्तान, स्कॉटलंड व नामिबिया यांना पराभूत करत सलग तीन विजय मिळवले. मात्र, संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होऊ शकला नाही. या स्पर्धेसाठी विराट कोहली याने टी२० संघाचे नेतृत्व सोडले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---