आयपीएल २०२१ स्पर्धेत रविवारी (३ ऑक्टोबर) क्रिकेट चाहत्यांना डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. यामधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स या दोन्ही संघांमध्ये रंगला. या सामन्यात बेंगलोर संघाने पंजाब किंग्स संघावर ६ धावांनी विजय मिळवला आहे. यासह प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा बेंगलोर तिसरा संघ ठरला आहे. दरम्यान पंजाब किंग्स संघाकडून ३९ धावांची खेळी करणाऱ्या केएल राहुलने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
छोटेखानी खेळीत बनवला विक्रम
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करताना १६४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार केएल राहुलने हातभार लावत ३९ धावांची खेळी केली. मात्र, तो मोठी खेळी खेळणार इतक्यात शाहबाज अहमदने त्याला हर्षल पटेलच्या हाती झेलबाद करत माघारी धाडले होते. दरम्यान ३९ धावा करत तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध सर्वात कमी डावात ५०० धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
केएल राहुलने आयपीएल कारकिर्दीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध खेळताना तुफान फटकेबाजी केली आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाविरुद्ध अवघ्या १० डावात ५०० धावा केल्या आहेत. तसेच पंजाब किंग्स संघासाठी खेळण्यापूर्वी त्याने २ हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तर या यादीत दुसऱ्या स्थानी सनरायझर्स हैदराबाद संघाचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर आहे. ज्याने हा कारनामा अवघ्या १३ डावात केला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाविरुद्ध सर्वात कमी डावात ५०० धावा करणारे फलंदाज
१० डाव – केएल राहुल*
१३ डाव – डेव्हिड वॉर्नर
बेंगलोरचा शानदार विजय
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून प्रथम फलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर, देवदत्त पडीक्कलने ४० आणि विराट कोहलीने २५ धावांचे योगदान दिले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्स संघाकडून मयंक अगरवालने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ३९ धावांची खेळी केली. तसेच एडेन मार्करमने शेवटी २० धावा बनविल्या. परंतु, पंजाब संघाला आव्हान पूर्ण करता आले नाही. पंजाब संघाला २० षटकाअखेर १५८ धावा करण्यात यश आले. यासह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ६ धावांनी विजय मिळवून प्ले ऑफचे तिकीट मिळवले.