भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहेत. यातील पहिला सामना यजमान भारताने जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना (14 जानेवारी) राजकोट येथे सुरू आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजी केली. रोहित शर्मा आणि कर्णधार शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. दोघांनीही अर्धशतकी भागीदारी केली, मात्र क्रिस्टियन क्लार्कच्या गोलंदाजीपुढे भारताचे स्टार फलंदाज अपयशी ठरले. भारताने पहिल्या चार विकेट्स 118 धावसंख्येवर गमावल्या, अशी बिकट स्थिती असताना केएल राहुल याने रविंद्र जडेजाच्या सहाय्याने संघाचा धावफलक हलता ठेवला.
राहुल आणि जडेजा यांनी संयमी फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. त्यातच राहुलने त्याचे 21वे वनडे अर्धशतकही पूर्ण केले. त्याने काईले जॅमिसनला चौकार मारत 53 चेंडूत 52 धावा केल्या असून तो खेळपट्टीवर उपस्थित आहे, तर जडेजा 27 धावा करत बाद झाला. त्याआधी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर लवकरच बाद झाले. दोघांकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र दोघे अनुक्रमे 23 आणि 8 धावा करत विकेट गमावून बसले.
या सामन्याच्या सुरूवातीला भारतासाठी न्यूझीलंडचा नवखा गोलंदाज क्लार्क डोकेदुखी ठरला. त्याने रोहित, विराट आणि अय्यर यांच्या विकेट पटकावल्या. नंतर त्याला राहुलने नीतीश कुमार रेड्डी आणि जडेजाच्या साथीने धावा वसूल केल्या.






