मुंबई । कर्णधार केएल राहुलच्या शानदार शतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्सच्या संघाला 97 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. संघाच्या या विजयामुळे कर्णधार केएल राहुल खूप आनंदी दिसत होता. सामन्यानंतरच्या पोस्ट मॅच प्रजेंटेशनमध्ये त्याने संपूर्ण संघाच्या एकत्रित कामगिरीचा विजय असल्याचे सांगितले. तसेच युवा खेळाडू रवी बिश्नोईचे खूप कौतुक केले आहे.
केएल राहुल याने पोस्ट मॅच प्रेजेंटेशनमध्ये सांगितले की, “मी इतका चांगल्या प्रकारे चेंडू मारण्यास सक्षम आहे यावर माझा खरोखर विश्वास नाही. काल मी मॅक्सशी गप्पा मारल्या, तो म्हणाला तुला कसे वाटते, मी म्हणालो की, मी माझ्या फलंदाजीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत नाही, तो म्हणाला की तू विनोद करत आहे असे वाटते, तू खरोखर चांगला खेळत आहेस.”
राहुल पुढे म्हणाला, “मला माहीत आहे की, मी खेळपट्टीवर वेळ घालवला तर बॅटच्या मधोमधून मी काही चेंडू मारू शकतो आणि मला आनंद झाला आहे की मी असे करण्यास सक्षम आहे. मला पुढील सामन्यांमध्येही असाच खेळ करायचा आहे.”
“एकदा मी नाणेफेकी दरम्यान आलो, तेव्हा मी स्वत: ला एक कर्णधार समजत होतो. अन्यथा मी खेळाडू आणि कर्णधार म्हणून संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो. विजय संपूर्ण संघाच्या एकत्रित प्रयत्नांमधून मिळतो, म्हणून प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. या खेळाकडे जाण्याची आमची वेगवेगळी योजना होती. आम्हाला माहित आहे की, आरसीबीकडे जबरदस्त फलंदाजांची फळी आहे. आम्हाला 2-3 विकेट्स घ्याव्या लागतील आणि याचा अर्थ धावफलकावर धावा करणे देखील आवश्यक आहे. या विजयामुळे आमचे विश्लेषक, प्रशिक्षक आणि व्यवस्थापन आनंदी असतील,” असेही केएल राहुलने सांगितले.
रवी बिश्नोईनी मला प्रभावित केले
रवी बिश्नोईचे कौतुक करताना किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल म्हणाला की, “रवी बिश्नोईचे पहिले षटक महाग ठरल्यानंतर त्याने पुनरागमन केले आणि मला प्रभावित केले, मी त्याला 19 वर्षाखालील विश्वचषकात पाहिले होते. प्रत्येक वेळी जेव्हा मी चेंडू देतो तेव्हा त्याची चांगली कामगिरी करण्याची इच्छा असते. तथापि, त्याच्या खराब झालेल्या षटकात तो फिंच आणि एबीसारख्या फलंदाजांना गोलंदाजी करण्याबद्दल तो किंचित घाबरलेला होता.”