कोरोनामुळे 2020 वर्ष हे क्रिकेटसाठी फारसे सकारात्मक ठरले नाही. भारतीय संघाला देखील याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. जवळजवळ पाच महिने कुठल्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट झाले नाही. अनेक महत्वाचे सामने देखील कोरोनामुळे रद्द करण्यात आले होते. भारतीय संघ संपूर्ण वर्षात केवळ 9 वनडे सामने खेळला. मात्र या दरम्यानच भारतीय संघासाठी एक सकारात्मक बातमी समोर आली असून वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी केएल राहुल नवा स्टार म्हणून पुढे आला आहे.
राहुलने आपल्या फलंदाजी सोबतच यष्टीरक्षण कौशल्यामुळे देखील वनडे क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. राहुल 2020 वर्षांमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये विराट कोहली व रोहित शर्माला पछाडत भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
वन-डे क्रिकेटमध्ये 2020 वर्षात राहुलने बनवल्या सर्वाधिक धावा –
केएल राहुल ने 2020 वर्षात एकूण 9 वनडे सामने खेळले आहेत. या 9 सामन्यात त्याने 55 च्या सरासरीने तब्बल 433 धावा बनवल्या आहेत. यादरम्यान त्याने 1 शतक व 3 अर्धशतक झळकावले आहेत. राहुलने 29, चौकार व 16 षटकारांची देखील आतषबाजी केली. राहुलनंतर भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याच्या बाबतीत विराट कोहलीचा क्रमांक येतो.
विराटने 47 च्या सरासरीने 433 धावा केल्या आहेत.विराटने यात 5 अर्धशतके झळकावली आहेत, मात्र एकही शतक झळकावण्यात त्याला यश आले नाही. रोहित शर्माचा विचार केला असता त्याने या वर्षात केवळ 3 सामने खेळले आहेत. या 3 सामन्यात रोहितने एकूण 171 धावा बनवल्या आहेत.
साल 2020 वर्षात राहुलसह केवळ तीन फलंदाज करू शकले शतक –
भारताने 2020 मध्ये खेळलेल्या 9 सामन्यात केवळ 3 फलंदाजांना शतकी खेळी करण्यात यश आले. यामध्ये श्रेयस अय्यरने 103, केएल राहुल ने 112 व रोहित शर्माने 119 धावांची खेळी केली आहे.
भारतीय संघाला आगामी काळातही राहुलकडून अशाच प्रकारच्या उत्तम कामगिरी अपेक्षा असेल. 2021 मध्ये भारतीय संघ अनेक महत्त्वाच्या मालिका खेळणार आहे. त्यामुळे राहुलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
“भारताचा मेलबर्न कसोटीतील विजय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम पुनरागमनांपैकी एक”
खेळाडूंच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; इंग्लडचा संघ ‘हे’ पाऊल उचलण्याच्या तयारीत
रिकी पॉंटिंगचा ऑस्ट्रेलियन फलंदाजांना घरचा आहेर, टीका करताना म्हणाला…