आयपीएल २०२१ चा हंगाम अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे. हंगामातील प्लेऑफ सामने सुरु झाले आहेत. पण प्लेऑफच्या आधीच पंजाब किंग्जचा या हंगामातील प्रवास संपला आहे. पंजाब किंग्ज प्लेऑफमध्ये जागा बनवू शकला नाही. असे असले तरी, पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुलने संघासाठी त्याचे मोठे योगदान दिले आहे. त्याने पंजाब किंग्जसाठी १३ सामन्यांमध्ये सर्वाधित ६२६ धावा केल्या आहेत. अशातच आता राहुलविषयी मोठी माहिती समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार केएल राहुल या हंगामानंतर त्याचे पंजाब किंग्जसोबतचे नाते तोडणार आहे.
क्रिकबज वेबसाइटच्या वृत्तानुसार अशी माहिती समोर आली आहे की, केएल राहुल त्याची आयपीएल फ्रेंचायझी पंजाब किंग्जसोबत पुढच्या हंगामात खेळताना दिसणार नाही. अशात राहुलचे या चालू हंगामातील प्रदर्शन पाहून पुढच्या हंगामात त्याला आपल्या संघात सामील करण्यासाठी अनेक फ्रेंचायझी प्रयत्न करतील आणि मोठी किंमत देण्यासाठी तयार होऊ शकतात. आयपीएल २०२२ मध्ये दोन नवीन फ्रेंचायझींचा सामावेश होणार आहे. तसेच यावर्षी मेगा लिलावही होणार आहे. अशात जर केएल राहुल लिलावासाठी उपलब्ध असेल, तर त्याची मागणी अधिक असणार आहे.
राहुलने आयपीएच्या चालू हंगामात आतापर्यंत सर्वाधिक ६२६ धावा केल्या असून पंजाब किंग्ज स्पर्धेतून बाहेर गेला असला तरी ऑरेंज कॅप अजूनही त्याच्याकडेच आहे. सीएसकेचा ऋतुराज गायकवाड सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऋतुराजने हंगामात १५ सामन्यांमध्ये ६०३ धावा केल्या आहेत. पंजाब किंग्जने राहुलच्या नेतृत्वात या हंगामात १३ सामने खेळले आणि यापैकी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच गुणतालिकेत संघ १२ गुणांसह ६ व्या स्थानावर राहिला.
आयपीएल २०२१ चा अंतिम सामना १५ ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. आयपीएलनंतर लगेच दोन दिवसांनी टी-२० विश्वचषकाला यूएई आणि ओमानमध्ये खळण्यासा सुरुवात होणार आहे. पंजाब किंग्जचा आयपीएलमधील प्रवास संपला असल्यामुळे राहुल सध्या विश्वचषकासाठी बीसीसीआयसोबत बायो बबलमध्ये सहभागी होईल. विश्वचषकात तो भारतीय संघाच्या सलामीवीराची भूमिका पार पाडताना दिसण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘बिग बेन इज बॅक’! पुन्हा क्रिकेटचे मैदान गाजवायला सज्ज झाला स्टोक्स
निव्वळ योगायोग की आणखी काही? कर्णधार म्हणून जशी झाली सुरुवात तशीच झाली समाप्ती