चेन्नई। बुधवारी (२१ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील १४ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सुरु आहे. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना या निर्णयाचा फायदा घेता आलेला नाही. तरी यादरम्यान पंजाबचा कर्णधार केएल राहुलने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
या सामन्यात पंजाबकडून केएल राहुल आणि मंयक अगरवाल सलामीला फलंदाजीसाठी आले होते. मात्र, चौथ्याच षटकात केएल राहुल ६ चेंडूत केवळ ४ धावा करुन भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचा झेल केदार जाधवने घेतला. असे असले तरी केएल राहुलने टी२० क्रिकेट कारकिर्दीत ५००० धावांचा टप्पा पार करण्याचा मोठा विक्रम केला आहे.
त्याने टी२० क्रिकेट कारकिर्दीतील १४३ व्या डावात फलंदाजी करताना ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच जगातील एकूण क्रिकेटपटूंमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने १३२ डावांमध्ये हा कारनामा केला होता. त्याच्यानंतर आता या यादीत केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. त्यामुळे शॉन मार्शला तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले आहे. मार्शने १४४ डावात ५००० टी२० धावा केल्या होत्या.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये केएल राहुलने विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराटने १६७ व्या डावात टी२० क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या होत्या.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारे फलंदाज (डावांच्या तुलनेत)
१३२ डाव – ख्रिस गेल
१४३ डाव – केएल राहुल
१४४ डाव – शॉन मार्श
१४५ डाव – बाबर आझम
१५९ डाव – ऍरॉन फिंच
टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारे भारतीय फलंदाज (डावांच्या तुलनेत) –
१४३ डाव – केएल राहुल
१६७ डाव – विराट कोहली
१७३ डाव – सुरेश रैना
१८१ डाव – शिखर धवन
१८८ डाव – रोहित शर्मा
पंजाबच्या धावा
बुधवारी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाबकडून केएल राहुल बाद झाल्यानंतर अन्य फलंदाजांनीही नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे त्यांना २० षटकात सर्वबाद १२० धावा करता आल्या. पंजाबकडून मयंक अगरवाल (२२) आणि शाहरुख खान (२२) यांनाच २० धावांचा टप्पा पार करता आला. तर हैदराबादकडून खलील अहमदने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: लाईव्ह सामन्यात रिषभची सटकली; संघ सहकाऱ्याला म्हणाला, ‘शरीर मोकळं सोडून खेळ जरा’
“…म्हणून एमएस धोनी घेऊ शकतो थोडी विश्रांती”, माजी दिग्गजाचे मोठी प्रतिक्रिया
एकेकाळी महिलेला मारहण केल्याने झाला होता तुरुंगवास, आता आयपीएलमधील दमदार कामगिरीने लुटतोय वाहवा!