इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून उभय संघात टी२० मालिकेची रोमांचक लढत चालू आहे. ही लढत आता अंतिम टप्प्यात आली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि निर्णायक टी२० सामना शनिवारी (२० मार्च) अहमदाबाद येथे रंगणार आहे. २-२ ने बरोबरीवर असलेल्या टी२० मालिकेचा शेवटचा निकाल या सामन्यावर निर्भर असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ तगड्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरतील.
अशात भारतीय संघ सध्या खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलला पुन्हा सलामीला आजमावतील का अनुभवी शिखर धवनला संधी देतील? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मागील ५ सामन्यात तीन वेळा नोंदवला बदक
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० साामन्यापासून भारतीय संघाने सलामी जोडीत बदल केले आहेत. मात्र राहुल दर सामन्यात वरच्या क्रमांकावर कायम आहे. परंतु राहुल सातत्याने संघाच्या अपेक्षांवर खरा उतरण्यात अपयशी ठरत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून तो खराब फॉर्मचा सामना करत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी येथील शेवटच्या टी२० सामन्यात तो भोपळा न फोडता माघारी परतला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात तो अवघी १ धाव काढू शकला. त्यानंतर पुढील सलग २ सामन्यात त्याने शून्य धावा केल्या. अखेर चौथ्या टी२० सामन्यात त्याने दुहेरी धावसंख्या पार केली होती. परंतु केवळ १४ धावांवर त्याच्या खेळीला पूर्णविराम लागला. अशाप्रकारे मागील ५ टी२० सामन्यात राहुल ३ वेळा खाते न खोलता पव्हेलियनला परतला आहे.
मागील पाच सामन्यात केली २ अर्धशतके
दुसरीकडे अनुभवी सलामीवीर धवनला त्याच्या एका सामन्यातील खराब प्रदर्शनामुळे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याने पहिल्या टी२० सामन्यात डावाची सुरुवात करताना १२ चेंडूत फक्त ४ धावा केल्या होत्या. मात्र त्याच्या मागील ५ सामन्यांतील आकडेवारीवर नजर टाकायची झाली तर, त्याने तब्बल २ अर्धशतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथील टी२० सामन्यात त्याने अर्धशतक केले होते. तत्पुर्वी श्रीलंकाविरुद्ध पुणे येथे झालेल्या टी२० सामन्यातही धावांची पन्नाशी पार केली होती.
शिखर धवन का केएल राहुल?
अशात इंग्लंडविरुद्धचा पाचवा अटीतटीचा सामना जिंकणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. अशावेळी जर भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली तर त्यांच्या विजयाच्या अपेक्षा उंचावतील. अशात कर्णधार विराट कोहली सलामीसाठी पुन्हा राहुलवर विश्वास दाखवतो का धवनला संधी देतो? हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
आर्चर पुढे असताना पहिल्याच चेंडूवर षटकार, इतकी हिम्मत कुठून आली? सूर्यकुमार म्हणतो…
INDvENG: मालिका विजयासाठी दोन्ही संघ उत्सुक; निर्णायक पाचव्या टी२० सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही






