इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामात शारजाह येथे खेळलेल्या ४८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने पंजाब किंग्ज संघाचा ६ धावांनी पराभव करत प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले. या पराभवामुळे पंजाब किंग्जचा संघ प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता कमी झाली आहे, अशा स्थितीत पराभवानंतर कर्णधार केएल राहुलनेही संघाच्या कामगिरीवर निराशा व्यक्त केली आहे.
सामन्यानंतर फलंदाजांच्या कामगिरीवर निराशा व्यक्त केली आणि म्हटले आहे की, त्यांच्या संघाच्या फलंदाजांनी वर्षानुवर्षे चांगल्या फलंदाजीत लय राखता आलेली नाही, ज्यामुळे त्यांचा संघ प्रत्येक वेळी प्लेआफसाठी पात्र होण्याच्या मार्गावर पोहोचला असतानाच शर्यतीतून बाहेर होत असतो.
शारजाच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर १६५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पंजाब किंग्स संघाने चांगली सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. मात्र, केएल राहुल आणि मयंक अगरवाल हे दोन्ही सलामीवीर फलंदाज बाद होताच पंजाबची मधली फळी पूर्णपणे ढासळली आणि शेवटी ते लक्ष्य गाठण्यापासून सहा धावांनी मागे राहिले.
सामन्यानंतर बोलताना राहुल म्हणाला की, त्याच्या संघात मध्यम फळीत प्रमुख भूमिका निभावू शकणारा कोणताही फलंदाज नाही आणि हेच कारण आहे की, त्याचा संघ विजयाच्या जवळ असताना पराभवाला सामोरे जात आहे. यादरम्यान, त्याला विचारण्यात आले की सलग २-३ हंगामासाठी ऑरेंज कॅप मिळाल्यानंतर त्याला कसे वाटत आहे?
याला उत्तर देताना राहुल म्हणाला, ‘मी असे म्हणणार नाही की मला ही कामगिरी आवडली नाही, पण आमचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरल्यास मला अधिक आनंद होईल. या सामन्याचे लक्ष्य १०-१६ धावांनी अधिक होते. मॅक्सवेलसारखा फलंदाज, जेव्हा उत्कृष्ट फॉर्ममध्ये असतो, तेव्हा प्रतिस्पर्धी संघासाठी गोष्टी कठीण होतात. पण गेली अनेक वर्षे सातत्य हरवून बसलेल्या फलंदाजांमुळे आमचा संघ निराश झाला आहे. खरे सांगायचे तर आमच्या फलंदाजांनी आम्हाला निराश केले आहे.’
या दरम्यान, केएल राहुलने युवा खेळाडूंचे कौतुक केले आणि सांगितले की त्यांनी त्यांच्या कामगिरीद्वारे बरेच प्रभावित केले आहे, ते संघासाठी चांगले करू शकतात. परंतु आम्हाला मधल्या फळीच्या फलंदाजाबद्दल विचार करावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: चहलने टाकला आयपीएलचा सर्वोत्कृष्ट चेंडू? काही कळायच्या आत क्लीन बोल्ड झाला सरफराज
युएईमध्ये चालली चहलच्या फिरकीची जादू; बुमराहच्या विक्रमाची केली बरोबरी
तोंडचा घास हिरावला पावसाने, पण तरीही भारतीय महिला संघाने याबाबतीत घडवला इतिहास