मुंबई | इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपरजायंट्स संघ शानदार प्रदर्शन करत आहे. त्यांनी आतापर्यंत हंगामातील ५ पैकी ३ सामने जिंकले आहेत. यादरम्यान कर्णधार राहुलची कामगिरीही प्रशंसनीय राहिली आहे. शनिवारी (१६ एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध पुन्हा एकदा राहुलने त्याच्या बॅटचा करिष्मा दाखवला आणि खणखणीत शतक झळकावले आहे. हे आयपीएल २०२२ मधील दुसरे शतक आहे.
विशेष म्हणजे, राहुलने १९ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मुंबईच्या टायमल मिल्सला जबरदस्त चौकार खेचत आपले शतक पूर्ण केले आहे. ५६ चेंडू खेळताना ५ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने त्याने शतकाला गवसणी घातली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
त्यातही हा राहुलचा आयपीएलमधील १०० वा सामना होता आणि याच सामन्यात त्याने शतकी खेळी केल्यामुळे हे शतक त्याच्यासाठी अजून खास बनले आहे. तो १०० व्या आयपीएल सामन्यात शतक करणारा पहिलाच खेळाडू बनला आहे. तसेच हे त्याचे आयपीएल कारकिर्दीतील तिसरे शतक आहे.
राहुलने मुंबईविरुद्ध २ आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध १ अशी एकूण ३ शतके केली आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये वानखेडेवर मुंबईविरुद्ध राहुलने शतकी खेळी केली होती. त्यावेळी त्याने ६४ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या होत्या. तसेच २०२० मध्ये दुबईत बेंगलोरविरुद्ध १३२ धावांची खेळी खेळली होती.
आयपीएलमध्ये १ पेक्षा जास्त शतके करणारा दुसरा कर्णधार
याबरोबरच राहुल आयपीएलमध्ये १ पेक्षा जास्त शतके करणारा दुसराच कर्णधार बनला आहे. हे त्याचे कर्णधार म्हणून आयपीएलमधील दुसरे शतक आहे. त्याच्यापूर्वी विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार असताना ५ शतके केली होती.
सर्वाधिक शतकांच्या विक्रमात संजूची बरोबरी
याखेरीज त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या विक्रमात संजू सॅमसनसोबत बरोबरी केली आहे. संजूनेही आजवर आयपीएलमध्ये ३ शतके केली आहेत. तसेच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी ख्रिस गेलने सर्वाधिक ६, विराट कोहलीने ५, डेविड वॉर्नर व शेन वॉटसनने ४ शतके केली आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! मुंबई इंडियन्सविरुद्ध केएल राहुलची नाद खुळा इनिंग, १००व्या सामन्यात झळकावले ‘शतक’