गुरुवारी (८ ऑक्टोबर) दुबई येथे झालेल्या आयपीएल २०२०च्या २२व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने किंग्स इलेव्हन पंजाबला ६९ धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर पंजाबचा कर्णधार केएल राहुलने संघाच्या पराभवाचे कारण सांगतिले. हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना संघाला चांगली सुरुवात करता न आल्यामुळे आम्ही सामना जिंकणे अशक्य होते, असे बोलताना राहुल म्हणाला.
नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॉनी बेयरस्टोच्या ९७ धावा आणि कर्णधार डेविड वॉर्नरच्या अर्धशतकी खेळीमुळे हैदराबादने २० षटकात २०१ धावांचा भलामोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात पंजाबने पहिल्या ७ षटकांच्या आतच केवळ ५८ धावा करत महत्त्वपूर्ण विकेट्स गमावल्या. यात मयंक अगरवाल (९ धावा), सिमरन सिंग (११ धावा) आणि केएल राहुल (११ धावा) यांच्या विकेट्सचा समावेश होता.
याविषयी बोलताना राहुल म्हणाला की, “जेव्हा तुम्ही फक्त ६ फलंदाजांना घेऊन खेळत असाल आणि अशात पावरप्लेमध्येच तुमच्या इतक्या विकेट्स गेल्या असतील, तर पुढे समस्या वाढत जातात. मयंकचे धावबाद होणे ही आमच्यासाठी एक आदर्श सुरुवात नव्हती. त्याव्यतिरिक्त आम्ही जे-जे शॉट खेळलो ते थेट क्षेत्ररक्षकांच्या हातात गेले.”
असे असले तरी, डेथ ओव्हर्समध्ये चांगले गोलंदाजी प्रदर्शन केल्यामुळे राहुलने गोलंदाजांची प्रशंसा केली. पंजाब संघातील युवा गोलंदाज रवि बिश्नोई (२९ धावा ३ विकेट्स) आणि अर्शदिप सिंग (३३ धावा २ विकेट्स) यांनी हैदराबादच्या डावातील शेवटच्या ५ षटकात दमदार कामगिरी केली.
“गेल्या ५ सामन्यांत आमचा संघ डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करताना संघर्ष करताना दिसत होता. मात्र या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी केली. हैदराबादच्या आक्रमक सुरुवातीनंतर त्यांनी डावाखेर २३० धावा केल्या असत्या. पण आमच्या गोलंदाजांनी हिंमत दाखवली आणि दमदार पुनरागमन केले. तसेच पंजाबकडून ३७ चेंडूत ७७ धावांची विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या पूरनला पाहून चांगले वाटले. तो खूप शानदार फलंदाजी करत आहे,” असे शेवटी बोलताना राहुलने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून केदारला जडेजा, ब्रोव्होच्या आधी फलंदाजीला पाठवले, चेन्नईच्या प्रशिक्षकांनी दिले स्पष्टीकरण
वॉर्नरची चपळाई मयंक अगरवालला पडली महागात, झाला रनआऊट; पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला






