भारताचा सलामीवीर आणि उपकर्णधार केएल राहुल ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) तीन सामने खेळत एकेरी धावसंख्येवर बाद झाला. यामुळे पुढील सामन्यात त्याला खेळवू नका अशी चाहत्यांची मागणी असताना भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी चकीत करणारे विधान केले आहे. त्यांचा अजूनही राहुलवर विश्वास आहे आणि त्याला आम्ही पुढील सामन्यात संधी देणार आहोत, असे द्रविड यांनी म्हटले आहे.
भारताचा पुढील सामना बांगलादेशविरुद्ध आहे. हा सामना 2 नोव्हेंबरला ऍडलेड क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीच्या आशेने हा सामना दोन्ही संघासाठी जिंकणे अत्यावश्यक आहे. कारण सुपर 12च्या दुसऱ्या ग्रुपची गुणतालिका पाहिली तर दोन्ही संघांनी 3 पैकी 2 सामने जिंकले आहे, मात्र भारत नेट रनरेटने दुसऱ्या स्थानावर आहे. यामुळे भारताविरुद्धच्या सामन्याबाबत बोलताना बांगलदेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने म्हटले की आम्ही जिंकण्याच्याच इराद्याने मैदानात उतरणार आहोत. असे असताना द्रविड यांनी राहुललाच खेळवणार असे वक्तव्य केले आहे.
माध्यमांशी बोलताना द्रविड म्हणाले, “मला आणि रोहित शर्मा आम्हा दोघांनाही सलामीजोडीबद्दल काहीच शंका नाही. आम्हाला माहित आहे केएल राहुल किती प्रभावी फलंदाज आहे आणि त्यामुळेच आम्ही चिंतेत नाही. ऑस्ट्रेलियामध्ये खेळणे आमच्यासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. संघाने पहिले दोन सामने जिंकत उत्तम सुरूवात केली”
केएल राहुल (KL Rahul) याची या स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर त्याची सर्वोच्च धावसंख्या 9 आहे. तो पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 4 धावा करत बाद झाला. त्यानंतर त्याने नेदरलॅंड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही सामन्यात 9 धावा केल्या. त्याच्या या निराशाजनक कामगिरीमुळे तो टिकाकरांचा निशाना झाला आहे.
राहुलने 2022च्या आयपीएलमध्ये 600पेक्षा अधिक धावा केल्या. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये दोन नाबाद शतकेही केली आहेत, जी त्याने चौथ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना केली. त्याने 2016मध्ये भारताच्या टी20 संघात प्रवेश केला. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने पहिल्या क्रमांकावर फलंदाजी करताना 30 सामन्यात 1072 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 11 अर्धशतके केली असून तीन वेळा शून्यावर बाद झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफगाणिस्तान टी20 विश्वचषकातून ‘आऊट’! सोप्या विजयाने श्रीलंका गुणतालिकेत इंग्लंडच्याही पुढे
रोहित-विराट पुढचा टी20 विश्वचषक खेळणार? या प्रश्नावर भडकले टीम सिलेक्टर; म्हणाले, ‘तुम्ही असे…’