भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 06 डिसेंबरपासून ॲडलेड येथील ओव्हलवर खेळवला जाणार आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाईल. ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा पुनरागमन करेल. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने टीम इंडियाची कमान सांभाळली होती. तसेच रोहित शर्माच्या जागी केएल राहुलने यशस्वी जयस्वालसह सलामीची जबाबदारी स्वीकारली. दरम्यान आता केएल राहुलबाबत मोठे अपडेट समोर आले आहे.
ॲडलेड कसोटीपूर्वी एक प्रश्न चाहत्यांना सतावत होता की रोहित शर्मा ओपनिंगमध्ये परतणार की केएल राहुल आपले स्थान कायम ठेवणार? आता स्वतः कर्णधार रोहित शर्माने या प्रश्नाचे उत्तर देताना पुष्टी केली की केएल राहुल ॲडलेड कसोटीत सलामी करताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.
ॲडलेड कसोटीपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. ज्यात त्याने सलामीबाबत उत्तर दिले. रोहित शर्मा म्हणाला, “केएल राहुल ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता ते मी घरातूनच नवजात बाळाला माझ्या मांडीवर घेऊन पाहत होतो. तो शानदार खेळला त्यामुळे त्याच्या बदलाची गरज नाही. भविष्यात परिस्थिती वेगळी असू शकते. परदेशात केएल ज्या पद्धतीने फलंदाजी करतो. त्यामुळे तो या क्षणी त्या जागेसाठी (सलामी) पात्र आहे.”
पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी शानदार सलामी भागीदारी केली. टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात राहुल आणि जयस्वाल यांनी 201 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. या भागीदारीच्या जोरावर संघाने 487/6 धावा ठोकून डाव घोषित केला. केएल राहुलने 5 चौकारांच्या मदतीने 77 धावांची खेळी केली. तर जयस्वालने 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 161 धावा केल्या होत्या.
हेही वाचा-
टीम इंडियासाठी दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर आता हवामानाबाबत मोठे अपडेट समोर
अभिषेक शर्माची झंझावती खेळी; अवघ्या 28 चेंडूत ठोकले शतक, या विश्वविक्रमाशी बरोबरी
IND VS AUS; दुसऱ्या कसोटीसाठी संघाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा, 519 दिवसांनी या खेळाडूचे कमबॅक






