---Advertisement---

IPL 2026: लखनऊ सुपर जायंट्स संघ सोडला, पण केएल राहुलचा ‘तो’ विक्रम अजूनही अबाधित! जाणून घ्या सविस्तर

On: मंगळवार, मार्च 24, 2026 6:22 PM
---Advertisement---

केएल राहुल (KL Rahul) आता आयपीएलमध्ये कोणत्याही संघाचं नेतृत्व करत नाही. याआधी त्याने पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघांचे नेतृत्व केले आहे. सध्या राहुल अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. विशेष म्हणजे, राहुलने लखनऊची साथ सोडली असली तरी, त्या टीमसाठी त्याने केलेला एक खास रेकॉर्ड अजूनही कोणाला मोडता आलेला नाही. मात्र, यावर्षी हा विक्रम मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे.

केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सच्या पहिल्या हंगामापासूनच (2022) या टीमशी जोडला गेला होता. लखनऊचा संघ जेव्हा पहिल्यांदा आयपीएलमध्ये आला, तेव्हा राहुल त्यांचा पहिला कर्णधार बनला. टीमने त्याला मोठी रक्कम देऊन ताफ्यात सामील केले होते, पण तो टीमला जेतेपद मिळवून देऊ शकला नाही. 3 हंगाम लखनऊसोबत राहिल्यानंतर 2025 मध्ये राहुल दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला.

या 3 वर्षांत राहुलने लखनऊसाठी 38 सामन्यांत 1410 धावा केल्या होत्या. राहुलने लखनऊची साथ सोडून एक वर्ष झाले तरी, तो अजूनही या टीमसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या यादीत दुसरे नाव निकोलस पूरनचे आहे, ज्याने 43 सामन्यांत 1381 धावा केल्या आहेत. पूरन आता राहुलच्या विक्रमाच्या खूप जवळ आहे आणि तो यावर्षीही लखनऊकडूनच खेळणार असल्याने, तो राहुलला मागे टाकेल अशी पूर्ण शक्यता आहे.

राहुलने 2013 मध्ये आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 2018 मध्ये तो पंजाब किंग्समध्ये गेला आणि तिथे कॅप्टन्सीही केली. 2022 मध्ये तो लखनऊशी जोडला गेला आणि 2025 पासून तो दिल्लीच्या संघात आहे. आतापर्यंत तो एकूण पाच टीम्सकडून खेळला आहे. 145 सामन्यांच्या आयपीएल कारकिर्दीत राहुलने 46 च्या सरासरीने आणि 136 च्या स्ट्राईक रेटने 5222 धावा केल्या आहेत. यावर्षी दिल्लीसाठी तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---