भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी२० विश्वचषक २०२१ नंतर टी२० क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. पण, तो एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये संघाचा कर्णधार राहणार आहे. आता प्रश्न असा आहे की, विश्वचषकानंतर टी -२० क्रिकेटचे कर्णधारपद कोणाच्या हाती जाईल, अर्थात त्याचा सर्वात मोठा दावेदार रोहित शर्मा आहे. किंवा टी -२० मध्ये रोहित शर्माच पुढील कर्णधार असेल, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
टी -२० मध्ये रोहितचा कर्णधारपदाचा रेकॉर्ड खूप चांगला आहे, त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ५ वेळा आयपीएल चषक जिंकला आहे. प्रत्येक कर्णधार येताच संघात मोठे बदल घडत असतात. तर आज आपण त्या चार खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, जे रोहितच्या नेतृत्वाखाली संघाचे उपकर्णधारपद होऊ शकतात.
१. केएल राहुल
केएल राहुल हा भारतीय संघाच्या मुख्य फलंदाजांपैकी एक आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी खूप चांगली झाली आहे, तर नुकत्याच इंग्लंडसोबत झालेल्या कसोटी मालिकेतही राहुलने सलामीवीर म्हणून आपली भूमिका बजावली. राहुलमध्ये ते सर्व गुण आहेत, ज्याच्या आधारे तो संघाचा पुढील उपकर्णधार होऊ शकतो. राहुल आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाचा कर्णधारही आहे. त्याला आयपीएलमध्ये फारसे यश मिळालेले नाही, तो अजून त्याच्या पहिल्या ट्रॉफीची वाट पाहत आहे.
२. रिषभ पंत
रोहित शर्मा टी -२० कर्णधार झाल्यानंतर रिषभ पंत भारतीय संघाचा पुढील टी -२० उपकर्णधार होऊ शकतो. पंतने गेल्या काही महिन्यांत भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे आणि म्हणूनच तो तिन्ही प्रकारामध्ये संघाचा अविभाज्य भाग बनला आहे. यासह, अय्यरच्या दुखापतीनंतर आयपीएल २०२१ हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपदही तो सांभाळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीनेही उत्तम खेळ दाखवला आहे. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने अय्यरच्या पुनरागमनानंतरही आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांमध्ये पंतच्या कर्णधारपदासह जाण्याचा निर्णय घेतला आहे.
३. जसप्रीत बुमराह
बुमराह जागतिक क्रिकेटमधील सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक आहे, विशेषत: टी -२० क्रिकेटमध्ये डेथ ओव्हर्समध्ये त्याच्या चेंडूंवर धावा करणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नसते. रोहित शर्मा टी -२० कर्णधार झाल्यानंतर जसप्रीत बुमराह या प्रकारामध्ये उपकर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार असेल.
जसप्रीत बुमराह कसोटी, एकदिवसीय आणि टी -२० या तीनही प्रकारांमध्ये भारतीय संघाचा सर्वात महत्वाचा सदस्य आहे. जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांची चांगली मैत्री देखील आहे. दोघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात.
४. श्रेयस अय्यर
मुंबईच्या या युवा फलंदाजाने भारतासाठी अनेक प्रसंगी अनेक महत्त्वाच्या खेळी खेळल्या आहेत. २०१७ मध्ये पदार्पण केलेला हा खेळाडू संघासाठी मध्यक्रमाचा एक महत्त्वाचा सदस्य बनला आहे. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला दुखापतीमुळे अय्यर अनेक महिन्यांपासून खेळापासून दूर आहे. मात्र, आता तो दुखापतीतून सावरला आहे आणि आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे तयार झाला आहे.
त्याच्या नेतृत्वाच्या अनुभवाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अंतिम फेरीत धडक दिली होती. तसेच २०१९ साली त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीने सात वर्षांनंतर प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले होते. या संदर्भात, तो टी २० मध्ये भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाचा मुख्य दावेदार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
कुंबळेंच्या नेतृत्वात विराटची बॅट ओकते आग, वाचा ही जबरदस्त आकडेवारी
भारतात कुठे, कसा आणि किती वाजता पाहाणार मुंबई विरुद्ध चेन्नई सामना, जाणून घ्या एका क्लिकवर
‘या’ पाच भारतीय फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर आयपीएलमध्ये पडलाय षटकारांचा पाऊस, सर्व दिग्गजांचा समावेश