आशियाई देशातील क्रिकेट संघांचा विचार करता प्रामुख्याने पाकिस्तानने आजवर जगाला अनेक दर्जेदार गोलंदाज दिले असल्याचे दिसून येते. त्या खालोखाल भारताकडून कपिल देव, जवागल श्रीनाथ, झहीर खान, वरून आरोन, उमेश यादव यांसारख्या वेगवान गोलंदाजांनी आपला शिक्का जमवला. तर, श्रीलंकेचे चामिंडा वास, लसिथ मलिंगा हेच काय ते वेगवान गोलंदाज म्हणून नावारुपाला आलेत.
भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये खेळपट्ट्या सामान्यत: मंद आणि फिरकीला सहाय्यक असतात. त्यामुळे भारतीय उपखंडात फिरकी गोलंदाज मुबलक प्रमाणात दिसून येतात. ‘बांगलादेश संघाला मात्र वेगवान गोलंदाज मिळायला अगदी कमी कालावधी लागला. याचे कारण मश्रफी मुर्तझा. मुर्तझाने बांगलादेशाच्या वेगवान गोलंदाजीला खरी धार आणली.’
एखाद्या सिनेमा कथेप्रमाणे मुर्तझाचे पडले क्रिकेट विश्वात पाऊल….
मुर्तझाचा जन्म दक्षिण-पश्चिम बांगलादेशातील नरेल जिल्ह्यात झाला. त्याला लहानपणापासूनच फुटबॉल आणि बॅडमिंटनसारखे खेळ खेळायला आवडत असे. कधीकधी शाळेला दांडी मारत तो जवळच्या चित्रा नदीत पोहायला जात असे. क्रिकेटबद्दल त्याला तितकेसे आकर्षण नव्हते. कालांतराने तो क्रिकेटकडे वळला आणि नरेल जिल्हा संघात त्याचा समावेश करण्यात आला.
एका जिल्हास्तरीय सामन्यात, एकाच षटकात त्याने आपल्या संघाला सामना जिंकून दिला. त्याच्या या कामगिरीमुळेच त्याला बांगलादेशच्या १७ वर्षांखालील संघात स्थान देण्यात आले. त्यानंतर, १९ वर्षांखालील संघात खेळत असताना, मुर्तझावर वेस्ट इंडीजचे दिग्गज वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्ट्स यांची नजर पडली. त्यावेळी बांगलादेशचे गोलंदाजी प्रशिक्षक असलेल्या रॉबर्ट्स यांनी मुर्तझा बांगलादेशचे भविष्य असल्याचे सांगितले होते. रॉबर्ट्स यांच्या शिफारसीमुळे त्याला वरिष्ठ पातळीवर खेळण्याची संधी देण्यात आली. आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला त्याने तडा जाऊ दिला नाही, तसेच चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय संघाच्या दिशेने आगेकूच सुरू केली.
मुर्तझाची गोलंदाजीचा वेग म्हणजे बंदुकीची गोळीच….
वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्याने बांगलादेशसाठी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या काही वर्षातच त्याने अत्यंत वेगाने गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. फ्लॉवर बंधू, मायकल वॉन, नासिर हुसेन यांसारखे दिग्गज फलंदाजांचा समाावेश त्याच्या पहिल्या काही बळींमध्ये समाविष्ट होते. मुर्तझा १४५ किमी/प्रतितास इतक्या वेगाने गोलंदाजी करत. अशाप्रकारे गोलंदाजी करणारा तो पहिला आणि एकमेव बांगलादेशी गोलंदाज होता.
सन २००७ विश्वचषकातील भारताविरुद्धचा सामना त्याच्यासाठी स्वप्नवत ठरला. रॉबिन उथप्पा आणि विरेंद्र सेहवाग हे दोन्ही सलामीवीर व तळाचे दोन फलंदाज बाद करत त्याने भारताचा डाव १९१ धावांवर गुंडाळण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्याच सामन्यात बांगलादेशने भारताला विश्वचषकात पराभूत करण्याची किमया केली. त्यानंतरही, भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर गेला असता, दिनेश मोंगीयाच्या एका षटकात त्याने सलग चार षटकार खेचत आपल्या बॅटचे पाणी दाखवले.
आयपीएलच्या मैदानावरही मुर्तझाने उमटवला ठसा…
सन २००८ मध्ये सुरू झालेल्या आयपीएलमधील कोलकता नाइट रायडर्स संघाचा तो सदस्य होता. याच दरम्यान तो बांगलादेशचे क्रिकेट संघाचा कर्णधार देखील बनला. सततच्या दुखापतीमुळे त्याने २००९ मध्ये कसोटी क्रिकेटपासून बाजूला झाला. त्यानंतर त्याने आपले पूर्ण लक्ष, एकदिवसीय आणि ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटकडे वळवले.
मुशफिकुर रहिम, शाकिब अल हसन आणि मुर्तझा यांच्या दरम्यान अनेकदा बांगलादेश संघाच्या कर्णधारपदाची खुर्ची फिरत राहिली. २०१४ ला बांगलादेशच्या एकदिवसीय संघाचा नियमित कर्णधार झाल्यानंतर त्याने आपल्या संघाला २०१५ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व व २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीपर्यंत नेण्याची ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली.
तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजांवर आग ओकणारा मुर्तजा जगात एकमेवाद्वितीय…
मुर्तझा आपल्या संपूर्ण कारकीर्दीत दुखापतींनी त्रस्त राहिला. दुखापतीमुळेच त्याला कसोटी क्रिकेट लवकर सोडावे लागले होते. विश्वास बसणार नाही. परंतू, मुर्तजावर आतापर्यंत १५ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ज्यातील १० शस्त्रक्रिया गुडघे आणि घोट्याच्या आहेत. दुखापतींनी भरलेली कारकीर्द त्याने १८ वर्षापर्यंत खेचली आहे.
बांगलादेशाच्या संघाचे नेतृत्व वाहिलेला नायक….
सन २००९ मध्ये कसोटी क्रिकेटमधून बाजूला झालेल्या मूर्तजाने २०१७ मध्ये टी२० क्रिकेटला देखील अलविदा केला. मार्च २०२० मधील झिम्बाब्वे विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर त्याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आता, लवकरच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याची शक्यता आहे.
क्रिकेट ते राजकारण मुर्तझाचा यशस्वी प्रवास….
बांगलादेशमधील २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकाीत तो अवामी लीग या पक्षाकडून निवडणूक लढला. नरेल-२ या ठिकाणावरून तो मोठ्या मताधिक्याने निवडून देखील आला. आहे २०१९ ला त्याचा समावेश बांगलादेशच्या युवक कल्याण समितीत झाला. आपल्या ‘नरेल एक्सप्रेस फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेद्वारे तो अनेक समाजोपयोगी कामे करताना दिसून आला आहे.
नरेल एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेला मुर्तजा बांगलादेशच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. बांगलादेश क्रिकेटला आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात ओळख मिळवून देणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो.