सातव्या टी२० विश्वचषकातील पात्रता फेरीच्या सामन्यांना रविवारी (१७ ऑक्टोबर) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी स्कॉटलंडने बांगलादेशचा पराभव करत खळबळ उडवून दिली. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आयर्लंड व नेदरलँड्स हे युरोपातील दोन संघ आमने-सामने होते. अबुधाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आयर्लंडसाठी युवा अष्टपैलू कर्टिस कॅम्फरने ऐतिहासिक कामगिरी करत जगभरातील वृत्तपत्रांसाठी मथळे बनविले.
कॅम्फरने रचला इतिहास
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दृष्टीने काहीशे दुय्यम दर्जाचे संघ असलेल्या आयर्लंड व नेदरलँड्स यांच्यातील या सामन्यात नेदरलँड्सच्या डावातील दहावे षटक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरले. षटकाची सुरुवात वाईडने झाल्यानंतर त्याने दुसऱ्या चेंडूवर कॉलिन एकरमनला यष्टीरक्षकाकडे झेल देण्यास भाग पाडले. पंचांनी हा चेंडूदेखील वाईड ठरवलेला. मात्र, आयर्लंडने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितल्यानंतर फलंदाजाला बाद दिले गेले.
पुढील चेंडूवर दिग्गज रेयान टेन डोश्चे पायचीत झाला. त्याच्या जागी आलेल्या एडवर्ड्सला कॅम्फरने पायचित केले. परंतु, पंचांनी पुन्हा फलंदाजांच्या बाजूने निर्णय दिला. आयर्लंडचा कर्णधार बालबिर्नीने पुन्हा डीआरएस घेतला व फलंदाजाला बाद दिले गेले. याच बरोबर कॅम्फर आयर्लंडसाठी टी२० क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज बनला.
पुढील चेंडूवर वॅन डर मर्वला त्रिफळाचित करत त्याने चार चेंडूत चार बळी घेण्याची कामगिरी करून दाखवली. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये यापूर्वी अशी कामगिरी केवळ श्रीलंकेचा लसिथ मलिंगा व अफगाणिस्तानच्या राशिद खान यांनी केली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या वंशाचा आहे कॅम्फर
कर्टिस कॅम्फर हा मूळचा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. बावीस वर्षीय कॅम्फरचा जन्म जोहान्सबर्ग येथे झालेला. आपल्या आजीच्या आयरिश पासपोर्टमुळे तो आयर्लंडसाठी खेळण्यास पात्र ठरला. कर्टिसने द. आफ्रिकेच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचे देखील प्रतिनिधित्व केलेले.
फेब्रुवारी २०२० मध्ये प्रथम नामिबिया दौऱ्यासाठी त्याची आयर्लंड वुल्फ ( आयर्लंड अ ) संघात निवड झाली. त्याने त्याच दौऱ्यावर आपले लिस्ट ए व टी२० पदार्पण केले. कॅम्फरने आत्तापर्यंत १३ टी२० सामने खेळताना १८३ धावा काढलेल्या आहेत. यात त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ६२ आहे. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत ७ बळी आपल्या नावे केले आहेत.
मागील वर्षी इंग्लंड विरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात पदार्पण केले. त्या पहिल्याच मालिकेत आपल्या अष्टपैलू खेळाने त्याने सर्वांना प्रभावित केले. आश्वासक फलंदाजी व १३५ किमी प्रतितास अशा वेगाने गोलंदाजी करत त्याने क्रिकेट समीक्षकांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. तरुण व शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याकारणाने तो योग्य मार्गदर्शन मिळाल्यास, आयर्लंड क्रिकेटसाठी भविष्यात महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून उदयास येऊ शकतो.
आयर्लंडला या विश्वचषक स्पर्धेसात सुपर १२ साठी पात्र ठरायचे असेल आणि काही खळबळजनक निकाल नोंदवायचे असतील तर पॉल स्टर्लिंग, बालबर्नी, केविन ओब्रायन या अनुभवी खेळाडूंसोबतच कर्टिस कॅम्फर, हेरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, मॅकब्रायन व मार्क अडायर या युवा खेळाडूंना देखील आपले योगदान द्यावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
युएईत विराटला मिळणार का ‘ती’ संधी; अकरा वर्षांपासून पाहतोय वाट
असंही होऊ शकत! नेदरलँड्सच्या पाच फलंदाजांनी भोपळा न फोडल्याने घडला मोठा इतिहास
टी२० विश्वचषकात आयर्लंडच्या क्रिकेटपटूने घडवला इतिहास! ४ चेंडूत घेतल्या सलग ४ विकेट्स