इंग्लंडला क्रिकेटचा जन्मदाता देश म्हणून ओळखले जाते. इंग्लंडच्या संघात सुरुवातीपासूनच अनेक असे दर्जेदार क्रिकेटपटू होते, ज्यांची नावे आजही आदराने घेतली जातात. सर जॅक हॉब्स, फ्रेडी ट्रुमन, लेन हटन, जिम लेकर हे खेळाडू आजही सर्वांसाठी आदरणीय आहेत. जवळपास ऐंशीच्या दशकापर्यत इंग्लंडचा क्रिकेट संघात सर्व खेळाडू हे मूळ इंग्लंडचे असत. त्यानंतर मात्र, इतर देशांतील स्थलांतरित खेळाडूंना इंग्लंड संघात जागा मिळू लागली. पाकिस्तानचा अझहर मेहमूद तर पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केल्यानंतर इंग्लंड संघाशी जोडला गेला. आता देखील इतर देशांतील बरेच खेळाडू इंग्लंडच्या संघात दिसतात. २०१९ ला विश्वचषक जिंकलेल्या इंग्लंड संघातील १५ पैकी ७ खेळाडू मूळ इंग्लंडचे नव्हते. अशाच, खेळाडूंपैकी एक असलेला इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ओवेस शाह.
कराची टू लंडन असा प्रवास करत क्रिकेटपटू बनला शाह
पाकिस्तानच्या कराची शहरात जन्मलेल्या (22 ऑक्टोबर) ओवेस शाहने, तेथील रस्त्यांवर पहिल्यांदा क्रिकेट खेळले. टेनिस बॉल एका बाजूला चिकटपट्टीने गुंडाळून टेपबॉल क्रिकेट खेळले जाते. शाह लहानपणी असल्याच चेंडूने क्रिकेट खेळत. पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज वसीम अक्रम आणि वकार युनूस त्याचे आवडते खेळाडू. त्यालाही त्यांच्यासारखे गोलंदाज बनायचे होते. पण, शाहची फलंदाजीची शैली जावेद मियांदाद आणि विव रिचर्डस यांच्यासारखी आहे, असे म्हणून त्याची प्रशंसा केली जात. शाहच्या वयाच्या १३ व्या वर्षी, त्याचे कुटूंब लंडनमध्ये स्थायिक झाले. इंग्लंडमधील इतर युवा क्रिकेटपटूंपेक्षा शाह फिरकीपटूंविरुध्द अत्यंत कुशलतेने खेळत. मनगटाचा सुरेख वापर व उत्कृष्ट पदलालित्याच्या जोरावर, त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो लवकरच निवडसमितीच्या नजरेत आला आणि त्याने प्रथमश्रेणी क्रिकेट आणि इंग्लंडच्या ‘अ’ संघात प्रवेश केला.
इंग्लंडला विश्वचषक मिळवून देणारा पहिला कर्णधार
दक्षिण आफ्रिकेत आयोजित १९९८ च्या एकोणीस वर्षांखालील विश्वचषकात आणि पाकिस्तान विरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी शाहकडे इंग्लंड संघाचे नेतृत्व देण्यात आले. या दोन्ही स्पर्धात त्याने इंग्लंडला अजिंक्यपदे मिळवून दिली. १९९८ मध्ये एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाने जिंकलेला विश्वचषक, इंग्लंडने जिंकलेली सर्वात मोठी स्पर्धा होती.एकोणीस वर्षाखालील संघातील कामगिरीमुळे, त्याला ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी इंग्लंडच्या ‘अ’ संघात निवडले गेले होते, परंतु त्याचे पदार्पण होऊ शकले नाही. याच वेळी त्याच्या कामगिरीला घरघर लागली. त्याचा फॉर्म गेला. सलग दोन काउंटी हंगामात त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत.
आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि बॅडपॅच
सन १९९८ ते २००० त्याला अवघ्या ५०० धावा काढता आल्या. मात्र, २००१ च्या हंगामात त्याने मागील दोन हंगामातील अपयशाची भरपाई केली. ४१ च्या उत्कृष्ट सरासरीने त्याने हंगामात जवळपास हजार धावा जमवल्या. याचेच बक्षीस म्हणून त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघात निवड झाली. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ६२ धावा काढत, त्याने आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने मार्क स्ट्रेस्कॉथिकसोबत चौथ्या गड्यासाठी १७० धावांची विक्रमी भागीदारी केली. यानंतर पुन्हा त्याचा फॉर्म गेला आणि पाच सामन्यात तो अवघ्या ११ धावा काढू शकला. परिणामी त्याला संघातून वगळण्यात आले.
धावांचा डोंगर रचून केले पुनरागमन
सलग तीन वर्ष संघाबाहेर राहिल्यानंतर, त्याने पुन्हा देशांतर्गत क्रिकेटकडे वळत, आपल्या खेळात सुधारणा करण्यावर भर दिला. २००५ च्या काउंटी हंगामात तो १,५७८ धावांसह स्पर्धेतील सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला. या प्रदर्शनामुळे, त्याची राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याची संधी निर्माण झाली. वेस्टइंडीज दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंड ‘ब’ संघात त्याची निवड करण्यात आली. पण, दौऱ्याच्या अर्ध्यातच त्याला भारतात बोलवण्यात आले. काही प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्याला भारताविरुद्ध कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. २००८ च्या मुंबई कसोटीत पदार्पण करताना त्याने पहिल्याच डावात ८८ धावांची सुरेख खेळी केली.
टी२० क्रिकेटचा महारथी
दरम्यानच्या काळात, शाहची आक्रमक फटके खेळण्याची ताकद पाहून त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे जास्त लक्ष देण्याचा सल्ला काही माजी खेळाडूंनी दिला. त्याने देखील, एकदिवसीय व टी२० क्रिकेटमध्ये जास्त मेहनत घेण्यास सुरुवात केली. सन २००७ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारताविरुद्ध त्याने ओव्हलच्या मैदानावर, शानदार शतकी खेळी केली. हेच त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठरले. जुलै २००८ मध्ये मिडलसेक्सला टी२० चॅम्पियनशिप जिंकून देताना, अंतिम फेरीत त्याने ३५ चेंडूत ७५ धावा तडकावल्या.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन २००८ मध्ये निवृत्त झाल्यानंतर, त्याच्यी जागा घेण्यासाठी शाह सर्वोत्तम पर्याय होता. मात्र, तो या अपेक्षेसोबत न्याय करू शकला नाही. एखाद-दुसरी चांगली करून तो सातत्याने अपयशी ठरत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याला भरपूर संधी दिली. २००९ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत सलामीच्या सामन्यात, श्रीलंकेविरुद्ध केलेली ४४ धावांची खेळी वगळता, तो विशेष काही करू शकला नाही. पर्यायाने, त्याला राष्ट्रीय संघातील स्थान गमवावे लागले. सन २०१० मध्ये मिडलसेक्सने देखील त्याच्याशी असलेला करार संपुष्टात आणला.
आयपीएलमध्ये केली राजस्थानसाठी ‘रॉयल’ कामगिरी
पुन्हा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याने, शाहने जगभरातील व्यवसायिक टी२० लीग खेळण्यास प्राधान्य दिले. तो २००९ व २०१० मध्ये आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स व कोलकाता नाईट रायडर्स या संघांचा भाग होता. २०११ मध्ये नव्यानेच आयपीएलमध्ये दाखल झालेल्या कोची टस्कर्ससाठी देखील त्याने आपला खेळ दाखवला. शाहच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम हंगाम २०१२ चा ठरला. या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने, ३८ च्या शानदार सरासरीने व १३३ च्या प्रभावशाली स्ट्राईक रेटने ३४० धावा ठोकल्या.
बांगलादेश प्रीमियर लीगमधील वादानंतर तो पुन्हा इंग्लंडला गेला. इसेक्ससाठी एक हंगाम खेळल्यानंतर त्याने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय व प्रथमश्रेणी क्रिकेटला रामराम ठोकत, व्यावसायिक टी२० क्रिकेटपटू होण्याचे ठरवले. शाहने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ७ कसोटी, ७१ वनडे व १७ टी२० सामने खेळत, अनुक्रमे २६९, १,८२४ व ३४७ धावा काढल्या.
एकवेळी इंग्लंडमधील सर्वात प्रतिभावंत खेळाडू म्हणून नावाजला गेलेला शाह आपल्या प्रतिभेला न्याय देऊ शकला नाही. पुढील मार्क रामप्रकाश म्हणून त्याचे कौतुक केले जात. वारंवार संधी देवून देखील सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याने, शाहला इतिहास दखल घेईल, अशी कामगिरी करता आलीच नाही.
महत्वाचे-
ग्रॅहम गूचचा ‘स्वीप अटॅक’ अन् भारताची विश्वचषकातून ‘एक्झिट’
क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे प्रेमाच्या पिचवरही ‘लांबा’ आघाडीवरच राहिले! वाचा बेधडक ‘रॅम्बो’ची जीवनकहाणी
अवघ्या तीन वर्षात क्रिकेटविश्वात आपला धाक जमवणारे ‘ऍलन डोनाल्ड’