क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात एका सामन्यात चमकलेल्या, क्रिकेटपटुंची यादी मोठी आहे. सन १९७५ मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचे पाच बळी मिळवणारे गॅरी गिल्मोर, पदार्पणाच्या कसोटीत विश्वविक्रमी १६ बळी घेणारे नरेंद्र हिरवानी, आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक ठोकणारा पाकिस्तानचा फवाद आलम हे असे काही खेळाडू आहेत, ज्यांना पहिल्या सामन्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी ओळखले जात नाही. या यादीमध्ये, भारताचा अजून एक खेळाडू आहे, ज्या खेळाडूला फक्त चार चेंडूसाठी लक्षात ठेवले जाते. चार चेंडूमुळे ज्या खेळाडूची नोंद इतिहासात झाली, तो भारतीय वेगवान गोलंदाज म्हणजे जोगिंदर शर्मा. जोगिंदरने गुरुवारी (दि. ३ फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यानिमित्ताने त्याच्याविषयीच्या खास गोष्टी जाणून घेऊया…
सर्वसामान्य घरातील ‘जोगी’
हरियाणा राज्याला क्रीडापटूंची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. भारताचे सर्वात मोठे अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असलेले कपिल देव हे देखील हरियाणाचेच. त्याच हरियाणातील रोहतक येथे जोगिंदरचा एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म (23 ऑक्टोबर) झाला. जोगिंदरचे वडील एक पानटपरी चालवत. घरातील सर्व सदस्य व मित्रपरिवार त्याला आवडीने ‘जोगी’ म्हणत. आसपासची इतर मुले कबड्डीमध्ये दंग असताना, जोगिंदर क्रिकेट खेळायला लागला. जोगिंदरकडे मध्यमगती गोलंदाजी व खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन फटकेबाजी करण्याचे चांगले कौशल्य होते. याच कौशल्याच्या जोरावर तो भरभर प्रगती करत हरियाणाच्या रणजी संघातपर्यंत येऊन पोहोचला.
https://twitter.com/mjogindersharma/status/1621393735807549442?s=46&t=mMTaECpuS-zPRM3LNmTlag
धमाकेदार रणजी पदार्पण
जोगिंदरने २००२-२००३ च्या रणजी हंगामात हरियाणाकडून उत्तर प्रदेशविरुद्ध आपला पहिला प्रथमश्रेणी सामना खेळला. पहिल्याच सामन्यात अकरा बळी मिळवत, त्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. त्या हंगामात हरियाणासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडत, २८० धावांसह २४ बळी आपल्या नावे केले. पुढचा हंगाम देखील त्याच्यासाठी तितकाच यशस्वीरित्या संपन्न झाला. सलग दोन हंगामातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याची निवड दुलीप ट्रॉफीसाठीच्या उत्तर विभाग संघात झाली.
भारतीय संघातील धुरंदरांना केले होते पस्त
जोगिंदर शर्माचे नाव सर्वाधिक चर्चेत आले ते भारत अ संघाकडून खेळताना, राष्ट्रीय संघाविरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे. भारताचा राष्ट्रीय संघ व भारत अ यांच्यातील चारदिवसीय सामना बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित केला होता. या सामन्यातील पहिला डावात जोगिंदरने कमाल केली. त्यावेळी, भारतीय संघाचे सर्वोत्तम फलंदाज असलेल्या राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण व युवराज सिंग यांना जोगिंदरने स्वस्तात बाद केले. याच कामगिरीमुळे त्याचा भारतीय संघातील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला. २००४-२००५ च्या रणजी हंगामात विदर्भाविरुद्ध १४ बळी आणि दोन्ही डावातील शतकांमुळे, त्याची भारतीय संघात निवड झाली.
धोनीसोबत केले आंतरराष्ट्रीय पदार्पण
जोगिंदर २००४ च्या अखेरीस बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा सदस्य बनला. एकदिवसीय मालिकेच्या पहिल्याच सामन्यात त्याला संधी देण्यात आली. विशेष म्हणजे, भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या, एमएस धोनीने देखील या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. जोगिंदरने या सामन्यात ८ षटके गोलंदाजी करताना, २ निर्धाव षटके टाकत २८ धावा देऊन एक बळी मिळविला होता. पहिल्या सामन्यासारखी कामगिरी त्याला उर्वरित मालिकेत करता आली नाही. पदार्पणाच्या सामन्यानंतर तो आणखी तीन सामने खेळला. मात्र, त्याला या सामन्यात बळी घेण्यात अपयश आले. परिणामी, त्याला मालिकेतील अखेरच्या सामन्यातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
पहिल्याच आंतरराष्ट्रीय मालिकेत अपयशाचा सामना केल्यानंतर, त्याने पुनरागमनासाठी पुन्हा देशांतर्गत क्रिकेटकडे मोर्चा वळवला. नाउमेद न होता, तो आणखी उत्साहाने कामगिरी करू लागला. त्याला माहित होते, चांगली कामगिरी केली तर आपण पुन्हा भारतीय संघात निवडले जाऊ. २००४-२००५ रणजी हंगामात ३६ बळी आणि ४७२ धावा अशी देखणी कामगिरी त्याने केली. रणजी ट्रॉफी पाठोपाठ दुलीप ट्रॉफीमध्ये सुद्धा तो सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज होता.
टी२० विश्वचषकाद्वारे पुनरागमन
सर्व अनुभवी व वरिष्ठ खेळाडूंनी माघार घेतल्याने, प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या २००७ टी२० विश्वचषक संघात त्याची निवड करण्यात आली. ही आपली अखेरची संधी आहे, याची जाणीव जोगिंदरला होती. विश्वचषकात पाठवण्यात आलेला, संघ पूर्णता नवखा होता. कर्णधारपद देखील युवा धोनीच्या हाती सोपवण्यात आलेले.
भारतीय संघासाठी विश्वचषकाची सुरुवातच, पाकिस्तान विरुद्धच्या बॉल-आऊट थराराने झाली. सुपर-एटच्या पहिल्याच सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. पुढचा इंग्लंड विरुद्धचा सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा होता. यात सामन्याद्वारे जोगिंदरला टी२० पदार्पणाची संधी मिळाली. आपल्या पहिल्याच सामन्यात तो इतिहासाचा साक्षीदार झाला. कारण, याच सामन्यात युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात सलग सहा षटकार मारण्याची किमया केली. जोगिंदरसाठी वैयक्तिकरित्या हा सामना, विसरण्यासारखा राहिला. त्याच्या चार षटकात ५७ धावा लुटल्या गेल्या. पुढच्या, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने किफायतशीर गोलंदाजी केली. मात्र, बळींची पाटी कोरीच राहिली.
उपांत्य सामन्यात टाकले अखेरचे निर्णायक षटक
सलग दोन सामन्यात बळी मिळविण्यात अपयश आल्याने, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याला संधी मिळेल का नाही याबाबत शंका होती. कर्णधार धोनीने व संघ व्यवस्थापनाने, त्याच्यावर विश्वास दाखवत या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याला संघात कायम ठेवले. जोगिंदरनेही आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत, अंतिम षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २२ धावांची आवश्यकता असताना माइक हसी व ब्रेट ली यांना बाद करत, भारताला अंतिम फेरी गाठून दिली. हा सामना भारताने १५ धावांनी खिशात घातला होता.
अंतिम सामन्याचा थरार
विश्वचषकाचा अंतिम सामना म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी होता. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने होते. गौतम गंभीरच्या अर्धशतकाने व रोहित शर्माच्या आक्रमक ३० धावांच्या जोरावर भारताने १५७ धावा फलकावर लावल्या. प्रत्युतरात, इतर फलंदाज बाद होत असताना मिसबाह उल-हक टिच्चून फलंदाजी करत होता. त्याने सर्व भारतीय गोलंदाजांवर आक्रमणाचे धोरण अवलंबिले होते. विश्वचषक पाकिस्तानला नेण्यासाठी तो अग्रेसर होता.
#OnThisDay (2007): India wins the inaugural World T20 by 5 runs over Pakistan in front of 32,217 fans in Johannesburg. pic.twitter.com/cCOS7RRlO8
— ICC (@ICC) September 24, 2017
जोगिंदरच्या हाती चेंडू देत धोनीने खेळला जुगार
सामन्यातील अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती आणि पाकिस्तानचा एक गडी बाद होणे शिल्लक होते. भारतीय कर्णधार एमएस धोनी पुढे अखेरचे षटक टाकण्यासाठी फक्त दोन पर्याय बाकी होते. पहिला होता, गेली ९ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत असलेला अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंह आणि दुसरा होता अवघ्या तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांचा अनुभव असलेला जोगिंदर शर्मा. धोनीने भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा जुगार खेळत, चेंडू जोगिंदरच्या हाती दिला.
निर्णायक षटक टाकण्यासाठी जोगिंदर सज्ज झाला. हा सामना भारताने जिंकला तर, भारतीय क्रिकेटला नवसंजीवनी मिळणार होती. धोनीसारखा कर्णधार मिळणार होता, महत्वाचे म्हणजे भारत २४ वर्षानंतर विश्वचषक जिंकणार होता आणि या सर्व इतिहासाचा नायक होण्याचा मौका जोगिंदरकडे चालून आला होता.
ते चार चेंडू
मिसबाह अतिशय निर्दयपणे फलंदाजी करत असताना, जोगिंदर पहिला चेंडू टाकण्यासाठी धावला. दबावात हा चेंडू वाईड पडला. पुढचा चेंडू जोगिंदरने योग्य टप्प्यावर टाकत हुकवला. पाच चेंडूत १२ धावा असे समीकरण आले होते. जोगिंदरने दुसरा चेंडू टाकला आणि फुलटॉस पडलेल्या चेंडूला प्रेक्षकांत भिरकवायला मिसबाह मागे राहिला नाही. एका चेंडूत सामन्याचे पारडे पाकिस्तानच्या बाजूने झुकले. पाकिस्तानचा एकच गडी बाद होणे शिल्लक होते, मात्र मिसबाह बाद होईल असे अजिबात वाटत नव्हते. षटकार ठोकल्यानंतर, धोनीने जोगिंदरला काहीतरी कानमंत्र दिला. जोगिंदरने षटकातील तिसरा चेंडू टाकला आणि मिसबाहने एक विचित्र फटका खेळत चेंडू हवेत मारला. सर्वांच्या हृदयाची धडधड होत होती. चेंडू उंच गेला आणि फाईन लेगला उभ्या असलेल्या, श्रीसंतने ‘तो’ ऐतिहासिक क्षण आपल्या नावे केला. मिसबाह बाद झाला आणि भारत विश्वविजेता झाला होता. जोहान्सबर्गच्या त्या मैदानावर सगळीकडे भारताचा तिरंगा अभिमानाने डौलत असताना सर्व भारतीयांची छाती गर्वाने फुगली. या सर्व घटनेचा नायक होता जोगिंदर शर्मा.
पुन्हा नाही मिळाली आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी
विश्वचषक जिंकून आल्यानंतर, जोगिंदरचे नाव प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमींच्या तोंडी होते. हरियाणा सरकारने २१ लाख रुपये व हरियाणा पोलीसमध्ये नोकरी देत त्याला सन्मानित केले. मात्र, आश्चर्याची गोष्ट अशी की, यानंतर जोगिंदरने भारतासाठी एकही सामना खेळला नाही. चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएलचे दोन हंगाम खेळल्यानंतर, तो मोठ्या स्तरावरील क्रिकेटपासून दूर झाला.
डीवायएसपी जोगिंदर शर्मा
सन २०११ मध्ये एका अपघातात जोगिंदरच्या डोक्याला गंभीर इजा झाली. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर तो यातून बरा झाला आणि पुन्हा देशांतर्गत क्रिकेट खेळू लागला. अखेर, २०१६ मध्ये नोकरीत पूर्ण लक्ष देण्यासाठी त्याने क्रिकेटला अलविदा केला. सध्या हरियाणा पोलीसमध्ये डीवायएसपी या पदावर तो कार्यरत आहे. कोरोना महामारीच्या काळात, रस्त्यावर उतरून जनतेची सेवा करताना, जोगिंदरला आपले कर्तव्य पार पाडताना पाहून प्रत्येक क्रिकेटप्रेमीला त्याचा अभिमान वाटला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मराठीत माहिती- क्रिकेटर जोगिंदर शर्मा
‘त्या’ दिवशी सामान्य दिसणारा जोगिंदर शर्मा भारतीय संघाचा हिरो बनलेला, जाणून घ्या एका क्लिकवर
बिग ब्रेकिंग! भारतीय क्रिकेटर जोगिंदर शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, ट्वीट करत दिली माहिती