दिनांक ४ एप्रिल २०२२, जंटलमन्स गेम क्रिकेटच्या आणखी एका जंटलमनने क्रिकेट जगताला रामराम ठोकला. निव्वळ आकडेवारीच्याच नव्हेतर कोणत्याही परिमाणात मोजल्यावर जो रॉस टेलर खऱ्या अर्थाने दिग्गज म्हणाला जाईल तो रॉस टेलर रिटायर झालाय. नेदरलॅंडविरुद्ध शेवटचा वनडे खेळून त्याने आपले बूट टांगले. न्यूझीलंड क्रिकेटच्या या ऑल टाइम ग्रेट क्रिकेटरचे करियर दैदिप्यमान राहिले.
टेलर न्यूझीलंडचा एक सर्वकालीन महान फलंदाज म्हणून कारकीर्द संपवत असला, तरीही हा प्रवास तितका सोपा नव्हता. मुळात टेलर हा सामोअन वंशाचे प्रतिनिधित्व करतो. म्हणजेच न्यूझीलंडमधील ही एक आदिवासी जमात मानली जाते. ही जमात प्रामुख्याने आपले परंपरागत व्यवसाय करते. पण टेलरने साऱ्या रूढी परंपरा मोडीत काढल्या. इतकंच नव्हे तर अन्यायाला आणि विरोधाला न जुमानता क्रिकेटमध्ये करिअर बनवले आणि आपल्या जीवनाचे तसेच न्यूझीलंड क्रिकेटचे कल्याण केले.
रॉस टेलर हा पहिल्यापासूनच खेळाच्या संस्कारात वाढला. पण त्याचं पहिलं प्रेम होतं हॉकी. अगदी ज्युनियर लेवलला तो हॉकी खेळला. त्याच्या त्या अलग-ढलग स्टाईलच्या बॅटिंगमध्ये जे स्लॉग स्विप दिसायचे ते याच हॉकीतून आलेले. पूर्वी एमसीसी जगभरातील प्रतिभावंत यंगस्टर्सला ट्रेनिंग द्यायची. सतराव्या वर्षी ते ट्रेनिंग घेण्यासाठी टेलरचे सिलेक्शन झाले होते. त्यामुळे टेलरने इंग्लंडमध्ये क्रिकेटची करियरची बाराखडी गिरवली.
क्रिकेट बॉलचा एक क्लीन स्ट्रायकर म्हणून त्याने अल्पावधीतच ओळख मिळवली. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण करतानाच त्याने याचा प्रत्यय दिलेला. २००७ नंतर जेव्हा ‘नेक्स्ट बिग थिंग इन क्रिकेट’ या शब्दांचा वापर व्हायचा तेव्हा विराट कोहली, हाशिम आमला, कायरन पोलार्ड यांच्या बरोबरीने टेलरचे नाव घेतले जायचे.
आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक झंझावाती बॅटर आलाय म्हटल्यावर त्याला आयपीएलमध्ये कोण घेणार नाही. २००९ ला आयपीएलचा सरंजाम दक्षिण आफ्रिकेत नेला होता. पहिल्या आयपीएलमध्ये फ्लॉप राहिलेल्या आरसीबीने नवख्या टेलरवर दाव लावला आणि त्या आख्ख्या आयपीएलची हायलाईट इनिंग जी राहिली ती इनिंग होती रॉस टेलरची. केकेआरविरुद्ध अवघ्या ३३ बॉलवर ८१ धावांचा पाऊस पडल्यावर टेलर रातोरात स्टार बनला. तेव्हा त्याचा कॅप्टन असलेला भारताचा ग्रेटेस्ट लेगस्पिनरने अनिल कुंबळेने त्याचे कौतुक करताना शब्द वापरले होते, ‘स्पिनर्सचा कर्दनकाळ’ हे शब्दच त्याच्यातील आक्रमकता दर्शवायला पुरेसे ठरतात.
२०११ ला भारतीय उपखंडात झालेला विश्वचषक न्यूझीलंडसाठी ज्या दोन खेळाडूंनी गाजवला ते म्हणजे रॉस टेलर आणि टीम साऊदी. पाकिस्तान विरुद्ध लीग स्टेजच्या सामन्यामध्ये जगातील सर्वात फास्ट बॉलर म्हणून आव आणणाऱ्या शोएब अख्तरला स्टेडियमच्या बाहेर सिक्स मारून त्याने अख्तरचे करिअरच संपवून टाकले. अख्तर त्या सामन्यानंतर पुन्हा कधी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये दिसलाच नाही.
२०१२ ला टेलर न्युझीलँडचा कॅप्टन बनला. त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी काही खास राहिली नाही. त्यानंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेत ब्रेंडन मॅक्यूलमकडे दिले गेले. ब्रेंडन मॅक्यूलम म्हणजे न्यूझीलंडचा आणखी एक दिग्गजच. या मॅक्यूलमने आपले पुस्तक ‘डिक्लेअर’मध्ये टेलर कॅप्टन म्हणून कसा अपयशी होता याबाबत अख्खा एक चॅप्टर लिहिलाय. हाच टेलरच्या गोल्डन करिअरमधील एकमेव काळा डाग.
मॅक्यूलम रिटायर झाल्यावर टेलर न्यूझीलंड क्रिकेटचा सर्वात अनुभवी स्तंभ बनला. नव्याने उदयास आलेला केन विलियम्सन अन् अनुभवी मार्टिन गप्टिल बॅटिंग डिपार्टमेंट सांभाळत होते. फॉर्मेट कोणताही असो टेलर विश्वासाचे दुसरे नाव बनलेला. त्याची कामगिरीही सातत्याने चांगलीच होत राहिली. पाहता-पाहता न्यूझीलंड क्रिकेटमधील सर्व मोठे रेकॉर्डस् त्याच्या नावे झाले. त्याचवेळी वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे त्याचे स्वप्ने दोन वेळा भंग पावले. २०१५ आणि २०१९ विश्वचषकाच्या फायनलमध्ये हरल्याने त्याच्यापासून विश्वचषक ट्रॉफी कायमची दूर झाली.
वनडे विश्वचषकाचे स्वप्न पूर्ण झाले नसले तरी, वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे त्याचे स्वप्न नक्कीच साकार झाले. पहिल्यांदाच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एकजूटीसाठी ओळखल्या जाणाऱ्या न्यूझीलंड संघाने फायनलमध्ये टीम इंडियाला मात दिली आणि टेलरचे चॅम्पियनशिप मेडलचे स्वप्न पूर्ण करून दिले. विनिंग स्ट्रोक मारण्याचा मानही तेव्हा टेलरलाच मिळालेला.
टेलर बोलत असताना मार्टिन क्रो यांचा उल्लेख व्हायलाच हवा. मार्टिन क्रो नावाच्या कारागीराने टेलरला घडवले. आपल्याला घडवणाऱ्या क्रो यांना टेलर कधीही विसरला नाही. क्रो यांना मागे टाकत ज्यावेळी टेलर न्यूझीलंडचा हायेस्ट टेस्ट रन गेटर बनला तेव्हा भर मैदानात धाय मोकलून रडला.
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मॅचेसची सेंच्युरी करणारा पहिला क्रिकेटर टेलर बनला. आता शतकानंतर जीभ काढून आपल्या मुलीच्या आठवणीत सेलिब्रेशन करणारा टेलर, आपल्या स्लॉग स्विपने बॅटमधून फटाके काढणारा टेलर, वेळोवेळी भावूक होणारा टेलर, अशी अनेक रुपं त्याची मैदानावर दिसली. ज्याप्रकारे न्यूझीलंडचे जेंटलमॅन क्रिकेटपटू नेहमी लक्षात राहतात तसाच रॉस टेलरही लक्षात राहणार यात वादच नाही!!!!
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाचा –
‘कॅरेबियन फ्लेवर’शिवाय आयपीएलला मजा नाय
मराठी माणसाला अभिमान वाटेल असा आहे वानखेडे स्टेडियम बनण्याचा इतिहास