श्रीलंका संघ फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका संघात (India vs Sri Lanka) टी२० आणि कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच रोहित शर्माकडे आता भारताच्या कसोटी संघाचेही नियमित कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटले ते २८ वर्षीय सौरभ कुमारच्या (Saurabh Kumar) निवडीचे. सौरभला भारताच्या कसोटी संघात (India Test Team) संधी देण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेविरुद्ध ३ टी२० आणि २ कसोटी सामने खेळायचे आहेत. २ कसोटी सामन्यांची मालिका ही आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असणार आहे.
आयपीएल लिलावात नव्हती मिळाली पसंती
अष्टपैलू खेळाडू असलेला सौरभ आयपीएल २०२२ लिलावात सहभागी होता. मात्र, त्याला कोणत्यात फ्रँचायझीने पसंती दाखवली नव्हती. त्यामुळे तो आयपीएल २०२२ साठी कोणत्याच संघात सामील नाही. त्याची २० लाख मुळ किंमत होती.
असे असले तरी, सौरभ यापूर्वी २०१७ साली रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा आणि २०२१ मध्ये पंजाब किंग्स संघाचा भाग होता.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावशाली कामगिरी
बागपत येथील रहिवासी असलेल्या सौरभने आपल्या कामगिरीने भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप पाडलेली आहे. तो भारताच्या देशांतर्गत क्रिकेट वर्तुळात चांगली ओळख असलेला खेळाडू आहे. त्याने सर्विसेस आणि उत्तरप्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २०१४ साली सर्विसेसकडून हिमाचल प्रदेशविरुद्ध पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने उत्तर प्रदेशकडून खेळणे सुरू केले. त्याने उत्तरप्रदेशकडून खेळताना अ दर्जाच्या आणि टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
त्याने आत्तापर्यंत ४६ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २९.११ च्या सरासरीने १५७२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २ शतकांचा आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने ४६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १९६ विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने १६ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याचबरोबर ६ वेळा एका सामन्यात १० विकेट्स घेण्याचाही पराक्रम त्याने केला आहे.
सौरभने २५ अ दर्जाचे सामने देखील खेळले असून त्यात १७३ धावा केल्या आहेत, तर ३७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याला ३३ टी२० सामने खेळण्याचाही अनुभव असून यात त्याने १४८ धावा केल्या आहेत आणि २४ विकेट्स घेतल्या आहेत. सौरभ डावखरी फिरकीपटू आहे. तसेच डाव्या हातानेच फलंदाजी देखील करतो.
भारतीय अ संघाकडून खेळलाय सौरभ
सौरभचा दक्षिण आफ्रिका २०२१-२२ दौऱ्यासाठी भारताच्या अ संघातही समावेश होता. मात्र, त्याला त्या दौऱ्यात खास कामगिरी करता आली नव्हती. त्याने २ कसोटीत ४ विकेट्स घेतल्या होत्या आणि २३ धावा केल्या होत्या.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अगरवाल, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, रिषभ पंत, केएस भरत, आर अश्विन (फिटनेसवर अवलंबून), रविंद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट-पंतच्या अनुपस्थितीत तिसऱ्या टी२० साठी ‘अशी’ असू शकते टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन
केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत- वेस्ट इंडिज तिसरा टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर
बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने तोडला साहाचा विश्वास, केले मोठे दावे; पण शेवटी कसोटीतून नारळ दिलाच