---Advertisement---

तब्बल ९ वेळा पुनरागमनाची संधी मिळालेला ‘विनोद कांबळी’; जाणून घ्या त्याच्या प्रवासाबद्दल

On: सोमवार, मे 16, 2022 10:03 AM
Vinod-Kambli
---Advertisement---

माजी भारतीय क्रिकेटर आणि सचिनचा जिगरी यार अशी ओळख असलेला पठ्ठ्या म्हणजे विनोद कांबळी. काही दिवसांपूर्वी कांबळीचा अति मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांचाही नक्कीच काळजी वाटली असणार. एकेकाळी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणारा विनोद कांबळीला असं पाहून कदाचित त्याच्या चाहत्यांनाही वाटलं असेल “कोण होतास तू, काय झालास तू?” या लेखातून आपण विनोद कांबळीबद्दल जाणून घेऊया.

कौशल्य हे व्यवस्थितरीत्या हाताळलं नाही तर, ते पुढे जाऊन काहीच कामाला येत नाही. याचं उदाहरण म्हणजे विनोद कांबळी, असे म्हणता येऊ शकते. १८ जानेवारी, १९७२ मध्ये मुंबईच्या इंदिरा नगरमध्ये कांबळीचा जन्म झाला होता. कांबळीचं बालपण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत गेलं. त्याचे वडील मॅकेनिक होते. विशेष म्हणजे, त्याचे वडील एक क्रिकेटरही होते. ते मुंबईच्या एका क्लबकडूनही खेळले होते. कांबळीवर कुटुंबातील ७ सदस्यांची जबाबदारी होती. असं असतानाही त्याची क्रिकेटवरील निष्ठा तसूभरही कमी झाली नव्हती. त्याकाळी मुंबईत क्रिकेट एका वेगळ्याच रुपात पुढं पुढं जात होतं. त्यादरम्यान एकापेक्षा एक क्रिकेटर्स बाहेर पडत होते. कांबळीही त्यातलाच एक होता. रंजक माहिती अशी की, सचिन तेंडुलकर आणि कांबळी एकाच शाळेत शिकत होते. चांगले मित्र होते. दोघांनाही क्रिकेटमध्ये करिअर करायचं होतं. त्यांनी रमाकांत आचरेकर सरांकडून क्रिकेटचे धडे घ्यायला सुरुवात केली.

दोघांनी मुंबईच्या कांगा लीग स्पर्धेत एकत्र पदार्पण केलं. शालेय क्रिकेट स्पर्धेत कांबळी आणि सचिन यांनी मिळून विक्रमी भागीदारी केलेली. शारदाश्रम शाळेकडून खेळताना त्यांनी सेंट झेवियर्स शाळेविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी विक्रमी ६६४ धावांची भागीदारी रचली होती. एकट्या कांबळीचे त्यात नाबाद ३४९ धावा होत्या. ही कामगिरी अनेक चाहत्यांना माहिती आहे. मात्र, तुफान फटकेबाजी केल्यानंतर कांबळीने या सामन्यात अप्रतिम गोलंदाजीपण केली होती. सेंट झेवियर्सच्या पहिल्या डावातही त्याने ३७ धावा देत ६ विकेट्सही घेतले होते. या विक्रमी भागीदारीनंतर दोघांची नावे चर्चेत आली. कांबळीच्या या अफलातून कामगिरीमुळे त्यांचे गुरू आचरेकर हे सचिनपेक्षा कांबळीला जास्त टॅलेंटेड मानायचे. पण पुढे सचिनला क्रिकेटचा देव मानलं जाऊ लागलं, तर कांबळीची गणना अयशस्वी क्रिकेटर्समध्ये झाली.

या जागतिक विक्रमानंतर सचिनने १९८८ मध्ये, तर कांबळीने त्याच्या एका वर्षानंतर १९८९ मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं होतं. पुढं सचिनला १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली, तेव्हा तो अवघ्या १६ वर्षांचा होता. परंतु, कांबळीला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी जरा वाट पाहावी लागली. पण ते म्हणतात ना प्रतिभा कधीही लपून राहत नाही. कांबळीसोबतही तसंच झालं. १९९१ साली पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यात कांबळीने वनडे पदार्पण केलं. पण त्या सामन्यात त्याला खेळण्याची संधीच मिळाली नाही. त्यानंतर मात्र त्याने न्यूझीलंडविरुद्ध खेळताना नाबाद ३० धावांची विस्फोटक खेळी करत आपल्या प्रतिभेचा जलवा दाखवला.

यानंतर कांबळी भारतीय संघाचा नियमित सदस्य बनला. कांबळीला पुढे १९९३ च्या सुरुवातीलाच इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. आणि याच कसोटीच्या तिसऱ्या सामन्यात २२४ धावांची द्विशतकी खेळी करत इतिहास रचला. कांबळीने २१ वर्षे आणि ३२ दिवसांच्या वयात द्विशतक ठोकले होते. त्यामुळे तो भारताकडून सर्वात कमी वयात द्विशतक करणारा खेळाडू बनला होता. पहिल्या ७ कसोटी सामन्यात ४ शतके ठोकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर होता. तो कसोटीत सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण करणारा खेळाडूही बनला होता. त्याने हा विक्रम १४ डावात केला होता. यानंतर तो भारताचा नियमित सदस्य बनलेला.

कांबळी चांगली कामगिरी करत होता. तेव्हाच १९९६ चा विश्वचषकाने दार ठोठावलं. या विश्वचषकात भारतीय संघ शानदार प्रदर्शन करत होता. तसेच विश्वचषकावर नाव कोरणारा प्रबळ दावेदारही मानला जात होता. पण याच विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात एक किस्सा झाला, ज्यामुळे त्या दिवसाला भारतीय क्रिकेट इतिहासातील काळा दिवस म्हणले, तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही. या सामन्यात भारताला २५२ धावांचे आव्हान मिळालं होतं. भारताच्या डावादरम्यान ३४ व्या षटकातच भारताचे ८ फलंदाज तंबूत गेले होते. क्रीझवर अनिल कुंबळे आणि विनोद कांबळी होते. पण प्रेक्षकांना भारतीय संघ हारताना दिसला आणि त्यांनी स्टेडिअममध्येच आग लावली. खेळाडूंना मैदानातून बाहेर नेण्यात आलं. त्यावेळी कांबळीच्या अश्रूंचा बांध तुटला होता. तो मैदानावरून बाहेर जाताना रडत होता. त्यावेळी सामन्याचा विजेता श्रीलंका संघ असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर गेला.

माध्यमांतील वृत्तानुसार या सामन्याच्या काही वर्षांनंतर खुद्द कांबळीने सांगितले होते की, “मी पण त्या उपांत्य सामन्याबद्दल विचार करतो. जेव्हाही मी तो सामना पाहतो, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं. आम्ही आख्ख्या स्पर्धेत चांगलं खेळलो, पाकिस्तानलाही हरवलं होतं. पण सचिन आऊट झाल्यानंतर इतर विकेट्सही पटापट पडू लागल्या. मी एका बाजूला उभे राहून ५ फलंदाजांना आऊट होताना पाहिलं. त्या सामन्यात एकाने जरी माझी साथ दिली असती, तरी मी तो सामना काढला असता. मी रडलो कारण मला वाटलं मी देशासाठी काहीतरी करण्याची एक संधीच गमावलीये.”

यानंतर त्याच्या आयुष्यात चढ-उतार आले. त्याच्याबद्दल असेही सांगण्यात आले की, त्याचे आणि संघातील खेळाडूंचं पटत नाही. त्याच्याबद्दल असंही म्हणलं जातं की, अचानक मिळालेलं स्टारडम त्याला सांभाळता आलं नाही. त्यामुळं त्याचं करिअर पुन्हा एकदा शिखरावरून जमिनीवर आपटलं.

माध्यामांतील वृत्तानुसार सचिनही एकदा म्हणाला होता की, “माझं आणि कांबळीचं लाईफस्टाईल पूर्ण वेगळं होतं. आमच्या स्वभावातही वेगळेपण होतं. विविध परिस्थितीनाही आम्ही वेगळ्याप्रकारे तोंड द्यायचो. माझ्या कुटुंबाचं लक्ष माझ्यावर असायचं. त्यांनी मला नेहमीच मातीशी जोडून ठेवलं. मी कांबळीबद्दल बोलणार नाही.” सचिनच्या बोलण्यावरून समजतं की, कांबळीची लाईफस्टाईल ही, पूर्ण वेगळी होती. कदाचित त्यामुळेच कांबळीचं करिअर ढासळलं. तो संघातून आत-बाहेर होऊ लागला. त्याला वनडे संघात ९ वेळा पुनरागमन करण्याची संधी मिळाली. पण तो यशस्वी होण्यात अपयशी ठरला.

असंही म्हणलं जातं, त्याने आरोप लावला होता की, त्याचे कर्णधार, सहकारी, निवडकर्ता आणि बोर्डामुळे त्याचे करिअर संपले. हे किती खरं आणि किती खोटं हे समोर आले नाही. पण एका रियॅलिटी शोमध्ये कांबळी म्हणाला होता की, त्याच्यासोबत संघात भेदभाव झाला. त्याने २००९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. क्रिकेटपासून दूर झाल्यानंतर त्यानं इतर व्यवसायातही हात आजमावला. त्याने सिनेमात काम केलं, टीव्हीवरही झळकला. पण कुठंही त्याचं नाणं चमकलंच नाही.

२००९ साली त्यानं राजकारणातही हात आजमावला. त्याने लोकभारत पार्टीच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवली. पण त्या निवडणूकीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यात बरेच चढ-उतार होते. पहिली पत्नी नोएला लुईस होती. तिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर त्याने मॉडेल एँड्रेया हेविटसोबत २०१४ साली लग्न केलं. या दोघांनाही ११ वर्षांचा मुलगाही आहे.

एका प्रतिभावान खेळाडूच्या करिअरचा असा शेवट होईल, असा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल. त्यामुळे त्याच्याकडे पाहून असंच वाटतं की, ‘कोण होतास तू, काय झालास तू?’

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वाचा – 

विराट आणि सचिन यांच्यातील नाते सांगणारे ४ भन्नाट किस्से

स्वत:च्याच देशाविरुद्ध शतक ठोकणारा सायमंड्स, वाचा त्याच्याबद्दल माहीत नसलेल्या १० गोष्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---