दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (IND vs SA) यांच्यात येत्या २६ डिसेंबरपासून ३ सामन्यांची ‘हाय वोल्टेज’ कसोटी मालिका (3 Match Test Series) होत आहे. आयसीसी जागतिक कसोटी चँपियनशीप (ICC World Test Championship) च्या दुसऱ्या हंगामाचा भाग असणारी ही मालिका कमालीची अटीतटीची होऊ शकते. दोन्ही संघांनी या मालिकेसाठी दर्जेदार खेळाडूंची फौज उभी केलेली दिसते. पाहुण्या भारताने या मालिकेसाठी ४ राखीव खेळाडूंसह १८ सदस्यीय संघाची निवड केली आहे. तत्पूर्वी कसोटी संघाचा नवनियुक्त उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून (Rohit Sharma Ruled Out) बाहेर गेला आहे.
त्याच्याजागी गेली पाच वर्षे देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या एका उमद्या सलामीवीराला संधी देण्यात आली आहे. तो खेळाडू आहे गुजरातसाठी गेली अनेक वर्ष धावांचा रतीब घालणारा सलामीवीर म्हणजे प्रियांक पांचाल (Priyank Panchal).
मुंबई येथे सरावादरम्यान रोहितच्या डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग दुखावले गेले. यामुळे तो भारतीय संघासह दक्षिण आफ्रिकेला जाणार नाही. त्याच्या जागी सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या इंडिया ए संघाचा कर्णधार व सलामीवीर प्रियांकचा १८ सदस्यीय संघात समावेश केला गेला आहे. याबाबत बीसीसीआयने अधिकृत ट्विट करत माहिती दिली आहे.
यानंतर भारतीय संघात थेट रोहितची जागा घेणारा प्रियांक नक्की आहे तरी कोण?, याची सर्वांना कुणकुण लागली आहे. चला तर पाहूया, कोण आहे, हा प्रियांक?.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बनला क्रिकेटर
नजीकच्या काळात भारतीय क्रिकेटला अनेक प्रतिभावंत खेळाडू देणाऱ्या गुजरात राज्याचा हा खेळाडू. तसा विचार करायला गेलं तर गुजरातमधील गुजरात, बडोदा व सौराष्ट्र असे एकूण तीन संघ रणजी स्पर्धेत प्रतिनिधित्व करतात. प्रियांक त्यापैकी गुजरात संघाचा भाग. प्रियंकाचे वडील किरीट हे विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळले होते. मात्र, काही कारणास्तव त्यांना आपली क्रिकेट कारकीर्द पुढे नेता आली नाही. परंतु, आपल्या मुलाने देशासाठी क्रिकेट खेळावे, अशी सर्वसामान्य भारतीय पालकांची असलेली अपेक्षा त्यांना आपल्या मुलाकडून देखील होती. पांचाल कुटुंब तसे बऱ्यापैकी सधन होते. त्यांनी प्रियांकाचा खेळ सुधारावा म्हणून त्याला अहमदाबादस्थित क्रिकेट क्लबमध्ये दाखल केले. छोटा प्रियांक वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मन लावून क्रिकेट खेळू लागला.
कुटुंबाची खंबीर साथ
अनेकदा चांगल्या वाटेमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. या अडचणी काही वाईट घटनांच्या रूपात समोर येतात आणि माणसाला दुःखात ढकलतात. अशीच एक घटना प्रियांकच्या आयुष्यात घडली. प्रियांक १५ वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. सर्वात मोठा आधार असलेले वडील अचानक गेल्याने प्रियांक काहीसा खचला. परंतु, फॅशन डिझायनर असलेल्या त्याच्या आईने व बहिणीने त्याला आधार दिला व पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी तयार केले. पंधरा वर्षांखालील वयोगटात गुजरातकडून पॉली उम्रीगर ट्रॉफी व सतरा वर्षाखालील गटात विजय मर्चंट ट्रॉफी गाजवल्याने वरिष्ठ संघाकडे त्याने वाटचाल सुरू केली.
एकाच हंगामात घेतले सर्वांचे लक्ष वेधून
वडिलांचे स्वप्न व आई-बहिणीची खंबीर साथ प्रियांकच्या कामी आली आणि १८ व्या वर्षी २००८ सालच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत सौराष्ट्रविरुद्ध त्याने आपले प्रथमश्रेणी पदार्पण केले. पहिली काही वर्ष प्रियांक गुजरात संघात नियमितपणे आपली जागा बनवू शकला नाही. तो सातत्याने संघाच्या आत बाहेर होई. मात्र, त्याने आपले ध्येय अटळ ठेवले होते. सन २०१६-२०१७ चा रणजी हंगाम प्रियांकसाठी सर्वकाही घेऊन आला. प्रियांकाने या हंगामात १० सामने खेळताना १,३१० अशा वैयक्तिक धावसंख्येचा डोंगर उभारला.
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक धावा नावावर असणाऱ्या व्हीव्हीएस लक्ष्मणपेक्षा या धावा १४६ ने कमी होत्या. यात पाच शतकांचा समावेश होता. त्यापैकी एक त्रिशतक होते. गुजरातकडून रणजी ट्रॉफीमध्ये त्रिशतक ठोकणारा तो पहिला खेळाडू बनला होता. याच वर्षी गुजरातने आपले पहिलेवहिले रणजी विजेतेपद पटकावले. या यशस्वी हंगामानंतर प्रियांकने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. त्यानंतरच्या प्रत्येक हंगामात तो गुजरातसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनत राहिला.
द्रविड-विराटचा चाहता आहे प्रियांक
प्रियांकच्या यशाचा आलेख कायम चढता राहिला आहे. भारत अ, इंडिया रेड, इंडिया ब्ल्यू या संघांचे त्याने प्रतिनिधित्व केले. प्रियांकला क्रिकेटव्यतिरिक्त माजी क्रिकेटपटूंचे आत्मचरित्र वाचण्यास आवडते. भारताचे दिग्गज सलामीवीर सुनील गावसकर यांचे आत्मचरित्र त्याचे आवडते आहे.
प्रियांक सांगतो, ज्यावेळी मला मोकळा वेळ मिळतो, त्यावेळी मी राहुल द्रविड यांचे २०११ साली इंग्लंड दौऱ्यावरचे व्हिडिओ पाहत असतो. त्या खेळ्यांमधून भरपूर काही शिकण्यासारखे असते. गावसकर व द्रविड यांच्या व्यतिरिक्त प्रियांक भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहली याचा मोठा चाहता आहे. विराट सारखी तंदुरुस्ती आपल्याला मिळावी, यासाठी तो भरपूर प्रयत्न करतो. विराटप्रमाणेच प्रियांकने देखील स्वतःसाठी काही डायट प्लॅन तयार केले आहेत.
शानदार आहे प्रथमश्रेणी आकडेवारी
प्रियांकची आतापर्यंतची प्रथमश्रेणी आकडेवारी पाहिली तर, ती अत्यंत प्रभावी दिसून येते. प्रियांकने आपल्या बारा वर्षाच्या कारकिर्दीत १०० प्रथम श्रेणी सामने खेळताना ४५.५२ च्या शानदार सरासरीने ७,०११ धावा जोडल्या आहेत. यात प्रत्येकी २५ अर्धशतके व २४ शतकांचा समावेश आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घातला असतानाही आजपर्यंत भारतीय संघाची कॅप मिळाली नाही. प्रियांकपेक्षा बरेच कनिष्ठ असलेल्या पृथ्वी शॉ, शुबमन गिल यांना फार पूर्वीच भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, प्रियांकला यासाठी बरीच वर्षे वाट पाहावी लागली. आता, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध थेट मुख्य संघात सलामीवीर म्हणून त्याला भारतीय संघात जागा मिळाली आहे. त्यामुळे आता प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळवत भारतीय संघाची कॅप मिळवतो की नाही?, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
शास्त्री गुरूजी म्हणतायेत, “तो माझ्या कार्यकाळातील सर्वात वाईट दिवस”
बिग ब्रेकिंग: रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ‘आऊट’; युवा सलामीवीराची लागली लॉटरी
‘ऋतूराजला आता टीममध्ये घ्या, २८व्या वर्षी घेऊन काय करणार?’ ‘या’ दिग्गजाचा मोलाचा सल्ला