आयपीएल २०२१ नंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये देखील युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (ruturaj gaikwad) जबरदस्त प्रदर्शन करत आहे. ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीत विरोधी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. यादरम्यान त्याने खेळलेल्या चार डावांमध्ये १४५ च्या सरासरीने ४३५ धावा केल्या आहेत. भारतीय संघाला आगामी काळात दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. अशात माजी दिग्गज दिलीप वेंगसरकर (dilip vengasarkar) यांच्या मते ऋतुराजला या दौऱ्यामध्ये भारताच्या वनडे संघात सामील केले गेले पाहिजे.
दिलीप वेंगसरकर ऋतुराजचे प्रदर्शन पाहून प्रभावित झाले आहेत. अशात त्यांनी दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऋतुराजला संधी मिळाली पाहिजे, असे मत मांडले आहे. त्यांच्या मते निवडकर्त्यांनी संघात एका फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूला निवडले पाहिजे आणि ऋतुराजने राष्ट्रीय संघात स्थान बनवण्यासाठी योग्यता सिद्ध केली आहे.
वेगसरकर म्हणाले, ‘‘तुम्हाला फॉर्ममधील एका व्यक्तिला निवडावे लागेल. स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याला अजून किती धावा कराव्या लागतील ? वेळ आली आहे की, निवडकर्त्यांनी त्याला तत्काळ निवडावे आणि त्याला योग्य संधी द्यावी. ऋतुराज एक असा खेळाडू आहे, जो भारतासाठी क्रमांक तीनवर देखील येऊ शकतो. त्याला संघात सामील केले गेले पाहिजे. ऋतुराज १८ किंवा १९ वर्षांच्या नाहीये. तो आता २४ वर्षांचा आहे. जेव्हा तो २८ वर्षांचा होईल तेव्हा त्याला निवडण्याला काहीच अर्थ नाहीये.”
दरम्यान, ऋतुराजचे यावर्षीचे आयपीएलमधील प्रदर्शन पाहिले, तर ते अप्रतिम राहिले आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ससाठी यावर्षी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. संघाला जेतेपद मिळवून देण्यात त्याचे मोलाचे योगदान होते. त्याने चेन्नईसाठी ४५.३६ च्या सरासरीने ६३५ धावा केल्या आणि ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला.
भारताच्या आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्याचा विचार केला, तर संघाला या दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यासाठी भारतीय संघ १६ डिसेंबरला दक्षिण अफ्रिकेला रवाना होईल. दौऱ्यातील कसोटी मालिका २६ डिसेंबर सुरू होणार आहे. तर, वनडे मालिका १९ जानेवारीपासून खेळली जाईल.
महत्वाच्या बातम्या –
आयएसएल: नॉर्थ ईस्ट युनायडेटविरुद्ध हैदराबाद एफसीचे पारडे जड; अव्वल चौघांत स्थान पटकावण्याची संधी
आयएसएल: एससी ईस्ट बंगालचे पहिल्या विजयाचे स्वप्न केरळा ब्लास्टर्समुळे भंगले
रोहितने दिले संकेत, ३५ वर्षांचा ‘हा’ गोलंदाज ठरू शकतो भारतीय संघातील हुकमी एक्का