मुंबई। रविवारी (१० एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात २० वा सामना पार पडला. हा सामना राजस्थानने ३ धावांनी जिंकला. पण, या सामन्यात एक ऐतिहासिक गोष्ट पाहायला मिळाली. ती गोष्ट म्हणजे राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू आर अश्विन रिटायर्स आऊट झाला. त्यामुळे तो आयपीएलमध्ये रिटायर्ड आऊट होणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
नक्की झाले काय?
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) प्रथम फलंदाजी केली. यावेळी राजस्थानकडून १० व्या षटकात आर अश्विन (R Ashwin) ६ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. खरंतर या क्रमांकावर राजस्थानकडून रियान पराग फलंदाजीसाठी येतो. पण या सामन्यासाठी अश्विनला बठती देण्यात आली होती. त्यानंतर तो शिमरॉन हेटमायरबरोबर फलंदाजी करत असताना १९ व्या षटकाचे पहिले २ चेंडू खेळून झाल्यानंतर बाद नसतानाही पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे तो रिटार्ड आऊट (Retired Out) झाला. त्याने २३ चेंडूत २८ धावा केल्या. तसेच हेटमायरसह ६८ धावांची भागीदारी केली.
अश्विनच्या या निर्णयामुळे आयपीएल इतिहासात असे पहिल्यांदाच असे झाले की एखादा खेळाडू रिटायर्ड आऊट झाला. यापूर्वी असे कधीही झाले नव्हते. अश्विन रिटायर्ड आऊट झाल्यानंतर रियान पराग मैदानात आला, त्याने ४ चेंडूत ८ धावा केल्या. तसेच हेटमायरसह २८ धावांची भागीदारी केली. त्यामुळे राजस्थानने २० षटकांत ६ बाद १६५ धावा केल्या. हेटमायरने ३६ चेंडूत नाबाद ५९ धावा केल्या.
रिटायर्ड आऊट म्हणजे नक्की काय?
रिटायर्ड आऊट म्हणजे जर एखादा खेळाडू सामना सुरु असताना पंचांची परवानगी न घेता मैदानाबाहेर गेला किंवा रिटायर झाला आणि जर त्याला प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराने त्याची खेळी पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिली नाही, तर त्याला रिटायर्ड आऊट दिले जाते. त्यामुळे ही खेळाडूची विकेटही मानली जाते.
जर प्रतिस्पर्धी संघाच्या संघाच्या कर्णधाराने त्याला पुन्हा खेळण्याची परवानगी दिली, तरच तो खेळू शकतो. अन्यथा त्याला रिटायर्ड आऊट म्हटले जाते. १४५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात आत्तापर्यंत अशाप्रकारे केवळ २ खेळाडू बाद झाले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू एकाच सामन्यात असे बाद झाले आहेत. २००१ ला श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात कोलंबो येथे झालेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचे फलंदाज मार्वन अट्टापट्टू आणि माहेला जयवर्धने अनुक्रमे २०१ आणि १५० धावा पूर्ण केल्यानंतर पंचांची संमती न घेताच मैदानाबाहेर गेले होते. त्यावेळी त्यांना रिटायर्ड आऊट देण्यात आले होते.
अनेकदा रिटायर्ड आऊट आणि रिटायर्ड हर्ट या क्रिकेटमधील संज्ञांमध्ये अनेकांची गल्लत होऊ शकते. पण या दोन वेगवेगळ्या संज्ञा आहेत. रिटायर्ड हर्ट म्हणजे जेव्हा एखादा खेळाडू दुखापतीमुळे किंवा आजारी असल्याने मैदान सोडतो. कारण त्याला मैदानाबाहेर उपचाराची गरज असते. तेव्हा तो खेळाडू उपचारानंतर पुन्हा खेळायला जाऊ शकतो. पण जर तो खेळाडू पुन्हा मैदानात येऊ शकला नाही तर त्याला ‘रिटायर्ड नॉट आऊट’ दिले जाते.
हा संघाचा निर्णय
अश्विन जेव्हा रिटायर्ड आऊट झाला, तेव्हा अनेकांना हा कोणाचा निर्णय आहे, असा प्रश्न पडला होता. कारण अश्विन शांततेत मैदानात परतला होता. त्याचबरोबर त्याच्याबरोबर फलंदाजी करणारा हेटमायर राजस्थान रॉयल्सची फलंदाजी संपल्यानंतर म्हणाला होता की, त्याला याबद्दल काहीच कल्पना नाही. पण सामन्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने सांगितले की, हा संघाचा निर्णय होता. तसेच आयपीएलचा हा हंगाम (IPL 2022) सुरू होण्यापूर्वीच जर गरज पडल्यास या नियमाचा उपयोग करण्याबद्दल चर्चा झाली होती, असेही त्याने सांगितले.
या सामन्यात राजस्थानने (LSG vs RR) दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ संघाला २० षटकांत ८ बाद १६५ धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना ३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL2022| हैदराबाद वि. गुजरात सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
IPL 2022| हैदराबादसमोर विजयीरथावर स्वार गुजरातचे आव्हान; केव्हा आणि कुठे होणार सामना, घ्या जाणून