येत्या १७ तारखेपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका सुरु होणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी दोनही बाजूंनी शाब्दिक द्वंद्व सुरु झाले आहे. परंतु काही माजी खेळाडू मात्र दोनही बाजूंच्या खेळाडूंच्या महानतेवर भाष्य करत आहे.
ऑस्ट्रेलिया संघासाठी कायमच डोकेदुखी ठरलेलंय व्हीव्हीएस लक्ष्मणने मात्र या बाबतीत वेगळं मत नोंदवलं आहे. लक्ष्मणने दोनही संघाच्या कर्णधारांवर भाष्य करताना त्यांच्यात मैत्री असण्याचे काहीच कारण नसल्याचं सांगितलं आहे.
लक्ष्मण म्हणतो, ” या दोन संघात होणारी मालिका ही नक्कीच जगातील सर्वात मोठे क्रिकेट युद्ध आहे. दोनही संघ चांगले क्रिकेट खेळतील. भारतीय संघाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाला कोणतीही संधी दिली नाही. परंतु ऑस्ट्रेलियाने चांगली लढत दिली.”
कोहली-स्मिथवर भाष्य करताना लक्ष्मण म्हणतो, ” ते सध्याच्या काळातील दिग्गज खेळाडू आहेत. त्यांनी जागतिक क्रिकेटवर जी काही छाप सोडली आहे ती नक्कीच मोठी आहे. मैदानावर हे दोनही खेळाडू पूर्ण व्यावसायिक पद्धतीने क्रिकेट खेळतात. त्यासाठी त्यांच्यात मैत्री असावीच असे काही नाही. त्यांच्यात आक्रमकता नक्की असावी. ही एक स्पर्धा आहे आणि त्यात कोणतीही मैत्री नक्कीच नसावी. ते दोघेही चांगलेच स्पर्धात्मक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. ”
कोहलीबद्दल…
भारतीय कर्णधार कोहलीबद्दल बोलताना लक्ष्मण म्हणाला, ” तो एक आक्रमक कर्णधार आहे. त्याने ज्या सकारात्मक पद्धतीने संघाला पुढे नेले आहे ते वाखाणण्याजोगे आहे. हा संघ रोज नवीन उंचीवर जात आहे आणि ते कुणाविरुद्ध खेळत आहे याचा अजिबात विचार करत नाहीत. हा संघ त्यांचे स्वतःचे लक्ष गाठण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे आणि त्यांच्यात कोणतीही कमतरता दिसत नाही. ”